सत्यध्येय एकविचार
शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
शिंदखेडा तालुक्यातील होळ येथील
गंगुबाई नागो माळी यांचे पती नागो माळी मयत झाल्यानंतर मौजे होळ प्र बे येथे त्यांचे वारसांची नोंद घेण्यात आली होती तरी वारसांपैकी वारस मुलगा मनोहर नागो माळी यांचे नाव ७/१२ वर लेखनिक चुकी मुळे आले नव्हते तसाच ७/१२ ऑनलाईन ला हि अपलोड झालेला होता १८ वर्षांपासून ७/१२ दुरुस्त करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर लढा देणाऱ्या एका ६० वर्षीय निराधार महिलेला अखेर न्याय मिळाला आहे. शिंदखेडाचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि तत्परतेमुळे होळ प्र बे येथील गंगुबाई नागो माळी यांच्या हातात १८ वर्षांनंतर हक्काचा सातबारा पडला. हक्काची जमीन नावावर झाल्याचे पाहताच गंगुबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
होळ प्र. बे (ता. शिंदखेडा) येथील रहिवासी असलेल्या गंगुबाई नागो माळी (वय ६०) यांचे पती नागो माळी हे मयत झाले होते. पती मयत झाल्यानंतर मौजे होळ प्र बे येथे नागो माळी यांचे वारसांची नोंद घेण्यात आली होती मुलगा मनोहर नागो माळी यांचे नाव ७/१२ वर लेखनिक चुकी मुळे आले नव्हते तसाच ७/१२ ऑनलाईन ला हि अपलोड झालेला होता. त्यामुळे गंगुबाई पूर्णपणे हतबल झाल्या होत्या.पती मयत असल्यामुळे शासकीय नियमांनुसार वारस नोंद झाल्यावरही सुटलेल्या वारसांची ७/१२ वर दुरुस्ती करणे कायदेशीरदृष्ट्या गुंतागुंतीचे बनले होते. याच कारणास्तव गेल्या १८ वर्षांपासून गंगुबाई वारस लावण्यासाठी शिंदखेडा तहसील कार्यालयात सातत्याने चकरा मारत होत्या, मात्र कागदपत्रांच्या तांत्रिक त्रुटींमुळे त्यांचे काम रखडले होते.
तहसीलदारांची संवेदनशीलता आणि तात्काळ कारवाई
शेवटी खचलेल्या गंगुबाईंनी शिंदखेडयाचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि आपली संपूर्ण कैफियत त्यांच्यासमोर मांडली. एका वृद्ध, निराधार महिलेची व्यथा ऐकून तहसीलदार देवरे यांचे मन हेलावले. त्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून कायदेशीर बाबी तपासून पाहिल्या आणि मानवतावादी दृष्टिकोन ठेवून संबंधित अधिकाऱ्यांना तातढीने कारवाईचे आदेश दिले.
महसूल यंत्रणेची तत्परता
तहसीलदारांच्या आदेशानंतर होळ गावच्या तलाठी सोनल थोरात यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच मंडळ अधिकारी परमेश्वर धनगर यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आली. सर्व तांत्रिक अडचणी बाजूला सारून गंगुबाई माळी यांच्या नावावर दुरुस्ती करून सातबारा तयार करण्यात आला.
आणि गंगुबाईंचे डोळे पाणावले
तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी स्वतः गंगुबाईंना त्यांच्या हक्काचा सातबारा सुपूर्द केला. गेल्या १८ वर्षांपासून ज्या कागदासाठी त्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत होत्या, तो सातबारा हातात पडताच गंगुबाईंना आपल्या भावना अनावर झाल्या. तहसीलदार, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचे आभार मानताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.”माझा कोणीही वाली नव्हता, पण साहेबांनी (तहसीलदार) माझं ऐकून घेतलं आणि मला न्याय दिला. १८ वर्षांचा माझा वनवास आज संपला,” अशा शब्दांत गंगुबाईंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.प्रशासनाने दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे महसूल विभागाच्या या कामगिरीचे शिंदखेडा तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
![]()
