धुळे | प्रतिनिधी
सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना करोडपती बनविण्याचे स्वप्न दाखवत, “₹१ लाख द्या आणि ₹७ लाख घ्या”, “इंडियन सेकंड करन्सी” अशा खोट्या आणि भ्रामक आमिषांनी जाळ्यात ओढून त्यांची निर्घृण लूट करणाऱ्या सराईत टोळीचा धुळे तालुका पोलिसांनी पर्दाफाश करत मोठे यश संपादन केले आहे. या धडक कारवाईमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असलेल्या फसवणुकीच्या नव्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर आकर्षक रिल्स व पोस्ट टाकून “कमी गुंतवणुकीत अनेक पटीने पैसे मिळतील” असे आमिष दाखवत नागरिकांशी संपर्क साधत होते. पैशांच्या लालसेपोटी संपर्क करणाऱ्या व्यक्तींना अजनाळे व हेंकळवाडी परिसरातील निर्जन ठिकाणी बोलावले जात होते. तेथे शस्त्राचा धाक दाखवत त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू जबरदस्तीने लुटल्या जात होत्या.या गंभीर गुन्ह्याची दखल घेत धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय मुंडे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी कारवाई केली. या कारवाईत मुख्य आरोपी सुनील ऊर्फ अविनाश शंकर भोसले याला अटक करण्यात आली.पोलीस चौकशीत आरोपीने आपल्या दोन साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून ₹९५ हजारांची रोकड जप्त केली असून, या टोळीने अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे. संबंधित साथीदारांचा शोधही पोलीस युद्धपातळीवर घेत आहेत.या कारवाईमुळे सोशल मीडियावरील बनावट गुंतवणूक, झटपट पैसे मिळण्याचे आमिष आणि खोट्या ऑफर्सच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी न पडता, अशा संशयास्पद पोस्ट किंवा रिल्सची त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन धुळे तालुका पोलिसांनी केले आहे.धुळे तालुका पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, सोशल मीडियाचा गैरवापर करून गुन्हे करणाऱ्यांना पोलिसांनी दिलेला हा जबरदस्त दणका मानला जात आहे.
![]()
