सत्यध्येय एकविचार
धुळे : प्रतिनिधी
धुळे शहरातील कुमार नगर, साक्री रोड परिसरातील प्रसिद्ध ११ मुखी हनुमान मंदिरातील दानपेटी चोरीप्रकरणाचा धुळे शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत यशस्वी छडा लावत दोन चोरट्यांना अटक केली आहे. मंदिराचे दरवाजे तोडून देवाच्या दानपेटीवर डल्ला मारणाऱ्या आरोपींना धुळे शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अत्यंत शिताफीने बेड्या ठोकत चोरीचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ ते २८ जूनच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कुमार नगर येथील ११ मुखी हनुमान मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कडी-कोंडा तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील स्टीलची दानपेटी आणि त्यामधील रोख रक्कम चोरून आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. सकाळी मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.या प्रकरणी मंदिराशी संबंधित किशोर सपकाळे यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. गुन्हा नोंद होताच पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि संशयितांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक नितीन चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. त्याआधारे डी.बी. पथकाने साक्री रोडवरील सुरत बायपासलगतच्या बजरंग सोसायटी परिसरात सापळा रचून ज्ञानेश्वर शिंदे आणि गणेश सोनवणे या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींना पोलिसांनी कसून चौकशीचा धाक दाखवताच त्यांनी मंदिरातील चोरीची कबुली दिली.आरोपींकडून ५ हजार रुपये किमतीची स्टीलची दानपेटी तसेच २ हजार ७४० रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीला गेलेल्या उर्वरित रकमेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू असून आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाने केलेल्या या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईचे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे. मंदिरासारख्या पवित्र स्थळावर चोरी करणाऱ्यांना काही तासांत जेरबंद करून धुळे शहर पोलिसांनी गुन्हेगारांना कडक इशारा दिला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
![]()
