सत्यध्येय एकविचार
शिंदखेडा (यादवराव सावंत :- प्रतिनिधी)
शिंदखेडा नगरपंचायतीच्या हद्दीतील विविध योजनांमधून मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांमध्ये गंभीर अनियमितता, विलंब, निकृष्ट दर्जाचे काम आणि प्रशासनाचा संशयास्पद कारभार समोर आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक कामांची मुदत संपूनही, काहींना मुदतवाढ देऊनही प्रत्यक्षात कामे अपूर्ण अवस्थेत पडून आहेत. धक्कादायक बाब म्हणजे काही कामांवर एक रुपयाही खर्च न झालेला असतानाही ती कागदोपत्री “प्रगतीपथावर” दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.या संपूर्ण प्रकरणाची ‘क्वालिटी कंट्रोल’मार्फत स्वतंत्र चौकशी करून संबंधित ठेकेदार, अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका रजुबाई सुभाष माळी आणि माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी यांनी मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.दोन्ही लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष कामांची पाहणी करून अनेक धक्कादायक बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. १४ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या प्रशासकीय सभेतील ठरावानुसार अनेक कामांना मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आजतागायत अनेक ठिकाणी ठेकेदारच फिरकले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी काही प्रमाणात काम झाले आहे तेथेही दर्जा अत्यंत निकृष्ट असून कामे अर्धवट अवस्थेत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संशयाच्या भोवऱ्यातील प्रमुख विकासकामे
▪ महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान नगरोत्थान (२०२३-२४)
सुमारे ₹४९.२५ लाखांच्या गटार बांधकामाचे काम मुदतवाढीनंतरही अपूर्ण. विशेष म्हणजे ₹० खर्च दाखवूनही काम प्रगतीपथावर असल्याची नोंद करण्यात आल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
▪ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना
₹१५.५९ लाखांच्या कामापैकी ₹७.४५ लाख खर्च झाल्याचे दाखवले असले तरी प्रत्यक्ष काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
▪ नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना
महात्मा ज्योतीराव फुले उद्यानासाठी ₹२२.५२ लाख मंजूर. ₹१४ लाखांहून अधिक खर्च होऊनही काम रखडले.
▪ आमदार स्थानिक विकास कार्यक्रम
माळीवाडा येथील सभागृहासाठी ₹२०.८३ लाख मंजूर. लाखो रुपये खर्च होऊनही बांधकाम अपूर्ण.
▪ वैशिष्ट्यपूर्ण योजना
जॉगिंग ट्रॅक, सुशोभीकरण, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा केंद्र आणि वाचनालय अशा महत्त्वाच्या कामांवर मोठा निधी खर्च झाल्याचे दाखवले असले तरी अनेक कामे अद्याप संथगतीने सुरू असून काही ठिकाणी नागरिकांना अपेक्षित सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत.
▪ प्रादेशिक पर्यटन विकास योजना
बुराई नदीकाठ सुशोभीकरण, काँक्रीट रस्ता, गटार, पेव्हर ब्लॉक, एलईडी स्ट्रीट लाईट यांसारखी कामे सात वर्षांनंतरही पूर्णत्वास न पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्रशासनावर थेट सवाल
नगरसेविका रजुबाई माळी व सुभाष माळी यांनी प्रशासनाला थेट प्रश्न विचारला आहे की, मुदत संपूनही कामे अपूर्ण का? निकृष्ट दर्जाच्या कामांवर आजपर्यंत कोणती कारवाई झाली नाही? ‘प्रगतीपथावर’ दाखवलेल्या कामांची प्रत्यक्ष पडताळणी कोणी केली? नागरिकांच्या कराच्या पैशाचा हिशोब कोण देणार?
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
“नगरपंचायतीचा हा कारभार नागरिकांच्या पैशाशी खेळ करणारा आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर आगामी काळात तीव्र लोकआंदोलन छेडले जाईल. त्यातून निर्माण होणाऱ्या सर्व परिस्थितीला संबंधित प्रशासनच जबाबदार राहील,” असा स्पष्ट आणि कडक इशारा नगरसेविका रजुबाई माळी व माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी यांनी दिला आहे.
![]()
