कोंडाईबारी (ता. साक्री, जि. धुळे), दि. ७ जुलै २०२६ : धुळे–सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील हनुमान मंदिराजवळ मंगळवारी सकाळी सुमारे ८.२० वाजण्याच्या सुमारास मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. ब्रेक निकामी झाल्याने ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटून समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रकला जोरदार धडक बसली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की चालक ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडला. मात्र महामार्ग पोलिसांच्या तत्पर, धाडसी आणि जीवाची पर्वा न करता केलेल्या बचावकार्यामुळे चालकाचे प्राण वाचले आणि मोठा अनर्थ टळला.मिळालेल्या माहितीनुसार, NL-01-AF-7400 क्रमांकाचा मालवाहू ट्रक बेंगळुरूहून अहमदाबादकडे कपड्यांचा माल घेऊन जात होता. चालक आदिल हाफिज (वय २१, मूळ रा. राजस्थान) हा कोंडाईबारी घाटातील धोकादायक उतारावरून जात असताना अचानक ट्रकचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रकला जोरदार धडक बसली. या धडकेत ट्रकच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.अपघातानंतर चालकाचा पाय ट्रकच्या केबिनमध्ये अडकला होता. त्यामुळे त्याला स्वतःहून बाहेर पडणे शक्य नव्हते. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक व इतर वाहनचालकांच्या मदतीने अत्यंत शिताफीने चालकाची सुखरूप सुटका करण्यात आली.या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली. मात्र प्रकृती स्थिर असल्याने त्याने रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात जाण्यास नकार दिला.अपघातामुळे काही काळ धुळे–सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी तातडीने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरू केली. त्यामुळे पुढील संभाव्य दुर्घटना व वाहतूक कोंडी टळली.ही संपूर्ण बचाव मोहीम एपीआय विवेक पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय प्रभाकर जाधव, पोलीस हवालदार अरुण कोळी, पोलीस हवालदार मुकेश हिरे आणि पोलीस हवालदार विजय बोरसे यांनी धाडस, प्रसंगावधान आणि कर्तव्यदक्षतेने पार पाडली.महामार्ग पोलिसांनी दाखविलेली तत्परता, धाडस आणि कर्तव्यनिष्ठेमुळे एका तरुण चालकाचे प्राण वाचले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत असून, संकटकाळात महामार्ग पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.
![]()
