सत्यध्येय एकविचार | रावेर (प्रतिनिधी)
रावेर तालुक्यातील अजंदा गावाजवळील रेल्वे पुल परिसरात बांधकाम ठेकेदाराला मजूर देण्याचे आमिष दाखवून निर्जन ठिकाणी नेऊन चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या आरोपींना रावेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या लुटारूंना मोठा दणका बसला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.फिर्यादी शेख जाबीर शेख अमान (वय ४१), व्यवसायाने बांधकाम ठेकेदार, रा. फारुकी आजम कॉलनी, चिनावल (ता. रावेर, जि. जळगाव) हे बांधकाम व्यवसायासाठी नियमित मजुरांच्या शोधात विविध गावांमध्ये फिरत असतात. त्यांच्या या गरजेची माहिती आरोपींना असल्याने त्यांनी पूर्वनियोजित कट रचला.दि. ४ जुलै २०२६ रोजी मुस्तकीम नावाच्या व्यक्तीने फिर्यादींना फोन करून दोन मजूर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. दुसऱ्या दिवशी मजुरांबाबत विचारणा केल्यावर त्याने फिर्यादींना विवरा येथे बोलावून घेतले आणि मजूर अजंदा गावात असल्याचे सांगत त्यांना तेथे जाण्यास भाग पाडले.फिर्यादी व मुस्तकीम अजंदा येथील रेल्वे पुलाजवळ पोहोचले असता पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हा जवळ दोन संशयित इसम उभे होते. “हेच ते मजूर आहेत,” असे सांगून फिर्यादींचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर रोजंदारीबाबत चर्चा करण्याच्या बहाण्याने त्यांना शेतात नेण्यात आले.निर्जन ठिकाणी पोहोचताच एका आरोपीने फिर्यादींच्या गळ्यावर चाकू ठेवून पैशांची मागणी केली. फिर्यादींकडे केवळ ५०० रुपये असल्याने ते आरोपींना द्यावे लागले. मात्र आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी फिर्यादींचा मोबाईल हिसकावून घेतला आणि मोबाईलचा पिन जबरदस्तीने विचारून त्यांच्या बँक खात्यातील रक्कम दुसऱ्या खात्यावर वळविण्याचाही प्रयत्न केला.घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे अवघ्या २४ तासांत आरोपींचा माग काढत त्यांना अटक करण्यात आली. या जलद कारवाईमुळे गंभीर स्वरूपाच्या रस्ता लुटीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.या कारवाईबद्दल रावेर पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अशा प्रकारे नागरिकांना फसवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांचा कठोर बडगा कायम राहणार असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. पुढील तपास रावेर पोलीस करीत आहेत.
![]()
