सत्यध्येय एकविचार | धुळे
धुळे जिल्ह्यातील साक्री व पिंपळनेर परिसरात घडलेल्या पशुधन चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावून उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस कॉन्स्टेबल अतुल संजय निकम , स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
मा. पोलीस अधीक्षक, धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष तपास पथक स्थापन करून सात दिवस सातत्याने गोपनीय माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण व प्रभावी तपासाच्या आधारे पशुधन चोरी करणाऱ्या चार आरोपींच्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून १५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच पशुधन चोरीचे आणखी चार गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले.या उल्लेखनीय व धाडसी कामगिरीची दखल घेत पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या उत्कृष्ट तपासकौशल्य, कर्तव्यनिष्ठा आणि जनसेवेबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन करत भविष्यातही अशीच उत्कृष्ट देशसेवा व जनसेवा घडत राहो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.या गौरवामुळे स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा सन्मान ही संपूर्ण पोलीस दलासाठी प्रेरणादायी बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.
![]()
