सत्यध्येय एकविचार भुसावळ | प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिक हा नागरिकांप्रती जबाबदार, सतर्क आणि कायद्याच्या चौकटीत राहून जनहितासाठी कार्य करणारा असला पाहिजे. संघटनात्मक शिस्त, जनसंपर्क आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका बजावावी, असे स्पष्ट निर्देश पक्षाचे उपनेते तथा रावेर लोकसभा मतदारसंघ व नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिले.भुसावळ येथे आयोजित रावेर लोकसभा मतदारसंघातील विभागीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, यावल नगराध्यक्षा छायाताई पाटील, शहरप्रमुख गणेश सोनवणे (चौधरी), उपजिल्हाप्रमुख गजानन निळे, रेल कर्मचारी सेनेचे ललित मुथा, विधानसभा क्षेत्रप्रमुख तोरण महाजन, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, उमाकांत शर्मा, महिला आघाडीच्या भुराबाई चव्हाण, भारती गोसावी यांच्यासह रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, भुसावळ, चोपडा व यावल येथील पदाधिकारी, शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.मार्गदर्शन करताना गुलाबराव वाघ म्हणाले की, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली संघर्षाची आणि जनसेवेची विचारधारा आजही लाखो शिवसैनिकांच्या मनामनात जिवंत आहे. लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकारी पक्ष बदलू शकतात; मात्र निष्ठावान शिवसैनिक हा संघटनेचा खरा कणा असून, त्याच्या बळावरच पक्ष अधिक मजबूत होत असतो. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने मरगळ झटकून नव्या उत्साहाने संघटनात्मक बांधणीसाठी कामाला लागावे आणि जनतेच्या प्रश्नांवर कायदेशीर व लोकशाही मार्गाने संघर्ष अधिक तीव्र करावा, असे त्यांनी सांगितले.बैठकीत शासनाच्या विशेष सघन पुनरावलोकन (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदान यादी अद्ययावत करण्यासाठी नियुक्त बीएलओंना (Booth Level Officers) आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच संघटनेतील रिक्त पदे तातडीने भरून पक्षाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देशही देण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या २७ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, अन्नदान व इतर समाजोपयोगी उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.यावेळी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर परिसरात वारंवार घडत असलेल्या चोरीच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध भारतीय कायद्यानुसार तातडीने गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी गुलाबराव वाघ यांनी केली. श्रद्धास्थानांच्या सुरक्षेबाबत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पक्षप्रमुखांच्या निर्देशानुसार राज्यातील प्रत्येक तालुक्यात रामरक्षा पठण व महाआरती आंदोलन आयोजित करण्यात येणार असून, या धार्मिक व सामाजिक उपक्रमात सर्व रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.बैठकीदरम्यान माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, युवराज पाटील आणि ललित मुथा यांनीही संघटनात्मक बळकटी, जनसंपर्क वाढविणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सक्रिय राहण्याबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन गजानन निळे यांनी केले, तर आभार शहरप्रमुख गणेश सोनवणे यांनी मानले.
![]()
