सत्यध्येय एकविचार | चाळीसगाव प्रतिनिधी
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेत आणखी एक मोठी कारवाई करत चाळीसगाव जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागातील वर्ग-१ चे उपविभागीय अभियंता यांच्या सांगण्यावरून ₹7 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाला रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे.तक्रारदाराने १५ व्या वित्त आयोगांतर्गत मंजूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे सुमारे ₹10.47 लाखांचे बिल काढण्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधला होता. मात्र, बिल मंजूर करून देण्यासाठी सुरुवातीला ₹10,500 लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत धुळे ACBकडे तक्रार दाखल केली.ACBने तक्रारीची गोपनीय पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. दरम्यान तडजोडीनंतर ₹7 हजारांची रक्कम स्वीकारण्याचे ठरले. ही रक्कम स्वीकारताना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाला ACBच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. चौकशीत ही रक्कम उपविभागीय अभियंत्याच्या सांगण्यावरून स्वीकारण्यात येत असल्याचे समोर आल्याने दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली.या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे.
![]()
