सत्यध्येय एकविचार शिरपूर | प्रतिनिधी
धुळे शहरातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून संपूर्ण प्रकरणाचा तपास जलद, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात यावा तसेच या प्रकरणाची सुनावणी विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयात करण्यात यावी, अशी ठाम मागणी महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात गुरुवार, ९ जुलै रोजी शिरपूर पोलीस निरीक्षकांना सविस्तर निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, धुळे शहरातील गोळीबार टेकडी परिसरात घडलेली १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी व गंभीर स्वरूपाची असून, या प्रकरणातील दोषींना कोणतीही दया न दाखवता कायद्यातील संबंधित कठोर तरतुदींनुसार कारवाई करण्यात यावी. तपासादरम्यान कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा हस्तक्षेप होऊ न देता सत्य समोर आणून दोषींना न्यायालयीन प्रक्रियेद्वारे कठोर शिक्षा मिळावी, अशीही मागणी करण्यात आली.महिलांवरील अत्याचार आणि अल्पवयीन मुलींविरुद्ध वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमध्ये त्वरित न्याय मिळणे अत्यावश्यक असल्याचे मंडळाने नमूद केले. या प्रकरणाची विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी करून पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळावा आणि भविष्यात अशा गंभीर गुन्ह्यांना प्रभावी आळा बसावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.यावेळी समाजबांधवांनी घटनेचा तीव्र निषेध नोंदवत प्रशासनाने तातडीने ठोस आणि कायदेशीर पावले उचलावीत, अन्यथा लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.निवेदन देताना नगरसेवक रोहित रंधे, महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष सदाशिव ठाकरे, उद्योजक अशोक बेटकर, तालुकाध्यक्ष भास्कर बोरसे, शहराध्यक्ष नितीन जाधव, नाईक समितीचे विभागीय प्रमुख उमेश खैरनार, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर ईशी, योगेश धोबी, नरेश पवार, नामदेव बोरसे, जितेंद्र बोरसे, वाल्मीक वाघ, पंकज धोबी यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाने प्रशासनाला स्पष्टपणे आवाहन केले की, या संवेदनशील प्रकरणात न्याय प्रक्रियेला गती देऊन दोषींना कठोर शिक्षा मिळेल यासाठी सर्व आवश्यक कायदेशीर उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, जेणेकरून पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यास विलंब होणार नाही आणि समाजात कायद्याविषयीचा विश्वास अधिक दृढ होईल.
![]()
