सत्यध्येय एकविचार
मुक्ताईनगर प्रतिनिधी :आकाश बेलदार
मुक्ताईनगर शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा वेगाने व शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत मुक्ताईनगर पोलिसांनी आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मध्य प्रदेशातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून एकूण ₹87 हजार 500 किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांचा उलगडा होण्यास मदत झाली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.शिव कॉलनी येथील रहिवासी प्रदीपकुमार मधुकर चौधरी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली.तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मनोजसिंग जीवनसिंग बन्सल (जि. बडवानी), प्रतापसिंग इंद्रसिंग बन्सल (जि. धार) आणि तुफानसिंग तिरलाल बडोले (जि. खरगोन, मध्य प्रदेश) या तिघांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता आरोपींनी परिसरातील विविध घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.आरोपींकडून चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ₹87 हजार 500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तसेच इतर जिल्ह्यांतील व राज्यांतील घरफोडीच्या गुन्ह्यांशी त्यांचा संबंध आहे का, याचाही सखोल तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या तपास पथकाने केली. गुन्ह्याचा अल्पावधीत छडा लावून आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तसेच अशा कारवायांमुळे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे रोखण्यास आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
![]()
