सत्यध्येय एकविचार | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंदे, तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, भगुर (ता. शेवगाव) येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर मावा निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत ₹१,२२,८२० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून मुख्य सूत्रधार फरार आहे.पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, बाळासाहेब नागरगोजे, प्रकाश मांडगे, मनोज साखरे, चालक भगवान धुळे तसेच महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांचा समावेश होता. या पथकाने शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती संकलित करत असताना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली.माहितीनुसार, नितीन ज्ञानदेव पुरणाळे (रा. भगुर, ता. शेवगाव) हा आपल्या घराच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये मशीनच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या सुगंधित तंबाखू व मावा तयार करून विक्री करत असल्याचे समजताच पथकाने तातडीने छापा टाकला.छाप्यात संकेत कडुबाळ गरुड (वय २३, रा. भगुर) हा प्रत्यक्ष मावा तयार करताना आढळून आला. चौकशीदरम्यान त्याने हा मावा नितीन ज्ञानदेव पुरणाळे यांच्या सांगण्यावरून तयार करत असल्याची कबुली दिली. मात्र मुख्य आरोपी नितीन पुरणाळे हा घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.कारवाईदरम्यान पोलिसांनी रत्नाछाप सुगंधित तंबाखू, सुपारी मिश्रित मावा, बारीक सुपारी, गोल सुपारी, मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रिक लोखंडी मशीन, प्लास्टिक पॅकिंग पिशव्या असा एकूण ₹१,२२,८२० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६७/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ च्या कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करत आहे.जिल्ह्यात आरोग्याला धोका निर्माण करणारे तंबाखूजन्य पदार्थ तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्या अवैध व्यावसायिकांविरोधात अशाच प्रकारच्या कठोर कारवाया आगामी काळातही सुरू राहतील, असा स्पष्ट संदेश या धडक कारवाईतून पोलीस प्रशासनाने दिला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, बाळासाहेब नागरगोजे, प्रकाश मांडगे, मनोज साखरे, चालक भगवान धुळे तसेच महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
