सत्यध्येय एकविचार | शिरपूर प्रतिनिधी
शिरपूर शहरात अन्न व औषध प्रशासन, धुळे कार्यालयाने बुधवार (८ जुलै २०२६) रोजी अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत व्यापक धडक मोहीम राबवत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यवसायिकांवर मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे शिरपूरातील बिनपरवानाधारक व नियमभंग करणाऱ्या आस्थापनांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.कारवाईदरम्यान मारुती ट्रेडर्स ताडी विक्री केंद्र (मच्छी बाजाराजवळ, शिरपूर) येथे तपासणी करून ताडीचा अन्न नमुना विश्लेषणासाठी जप्त करण्यात आला. तसेच ११० लिटर ताडीचा साठा (किंमत सुमारे ₹११,०००) शिरपूर नगर परिषदेच्या कचरा निर्मूलन केंद्रात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला.याशिवाय हरियाना जिलेबी सेंटर (नेहरू रोड) आणि हॉटेल गुरुकृपा (शिरपूर टोल नाक्याजवळ) ही दोन्ही आस्थापने वैध अन्न परवान्याशिवाय व्यवसाय करत असल्याचे आढळून आल्याने त्यांना नोटीस बजावत दोन्ही आस्थापना तात्काळ सील करण्यात आल्या.याच मोहिमेत हॉटेल बजरंग, यादगार रेस्टॉरेंट, हॉटेल पालवी, हॉटेल उत्सव आणि हॉटेल साहेबा या आस्थापनांचीही अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आढळलेल्या विविध त्रुटींवर संबंधितांना नोटिसा बजावण्यात येणार असून आवश्यक त्या कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ च्या कलम ६९ अंतर्गत एकूण ९ प्रकरणांमध्ये ₹१,०५,००० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यवसायिकांना बेकायदेशीर व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांच्या विरोधात पुढील दंडात्मक कारवाईसाठी प्रकरणे दाखल करण्यात येणार आहेत.ही धडक कारवाई सहायक आयुक्त (अन्न) श्री गोपाल माहोरे, अन्न सुरक्षा अधिकारी श्री आनंद पवार, श्री शशिकांत राणे आणि श्री अरबिंद राऊत यांच्या उपस्थितीत पार पडली.अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यवसायिकाला यापुढे अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. जिल्हाभर अशी धडक मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याने नियमभंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
![]()
