सत्यध्येय एकविचार | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील सरवड गावासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी प्रा. मच्छिंद्र गुलाब ठाकरे यांनी केली आहे. धुळे येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या भाऊसाहेब ना. स. पाटील साहित्य व मु. फि. मु. अ. वाणिज्य महाविद्यालयाच्या हिंदी विभागातील प्राध्यापक असलेल्या प्रा. ठाकरे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या वतीने ‘विद्यावाचस्पती’ (Ph.D.) ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रो. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली.सरवडसारख्या ग्रामीण भागातील एका सामान्य आदिवासी कुटुंबातून शिक्षणाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक यश संपादन करणारे प्रा. मच्छिंद्र ठाकरे हे आज अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक संकटांशी झुंज देत त्यांनी NET, SET आणि Ph.D. या महत्त्वपूर्ण शैक्षणिक टप्प्यांवर यश मिळवून प्राध्यापकपदापर्यंतचा प्रवास पूर्ण केला.महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी मजुरी करून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च उचलला. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही शिक्षणावरील निष्ठा आणि जिद्द कायम ठेवत त्यांनी प्रत्येक अडथळ्यावर मात केली. संशोधनाच्या काळात मोठे भाऊ युवराज ठाकरे यांच्यासह दोन मोठ्या भावांचे आणि वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र या कठीण प्रसंगांनाही त्यांनी धैर्याने सामोरे जात संशोधनाची वाट सोडली नाही. अखंड परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवत सरवड गावाचे नाव उज्ज्वल केले.आदिवासी समाजातील भिल्ल समाजात जन्मलेल्या प्रा. ठाकरे यांनी आपल्या बोलीभाषेतील उच्चारांवर सातत्याने मेहनत घेत हिंदी भाषेवर प्रभावी प्रभुत्व मिळवले. आज ते हिंदी विषयाचे अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जात आहेत. त्यांचा हा प्रवास शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.स्वामी विवेकानंद यांनी मांडलेल्या “शिक्षणाने माणूस निर्भय बनला पाहिजे” या विचाराचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. मच्छिंद्र ठाकरे यांचे जीवन होय. बहुजन समाजासाठी कार्यरत असलेल्या श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेने त्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली असून आज त्यांनी मिळवलेले यश संपूर्ण संस्थेसाठीही अभिमानाची बाब ठरली आहे.प्रा. मच्छिंद्र ठाकरे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार (धुळे ग्रामीण) मा. कुणालजी पाटील, उपाध्यक्ष डॉ. संजय टी. पाटील, माजी प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, माजी प्राचार्य डॉ. रवींद्र वाघ, विद्यमान प्राचार्य डॉ. जितेंद्र तलवारे, संशोधन मार्गदर्शक डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह शिक्षक, सहकारी, विद्यार्थी आणि सरवड ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सरवड गावातील पहिले NET, SET आणि Ph.D. पदवीधारक प्राध्यापक म्हणून डॉ. मच्छिंद्र ठाकरे यांनी मिळवलेले हे यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी आणि शिक्षणाच्या सामर्थ्याचा संदेश देणारे ठरले आहे.
![]()
