सत्यध्येय एकविचार
तळोदा | प्रतिनिधी
तळोदा शहरात गुन्हेगारांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असून चोरट्यांनी अक्षरशः पोलिसांनाच खुले आव्हान दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी गुरुकृपा मोबाईल शॉपची भिंत फोडून तब्बल ₹५२ लाखांचे मोबाईल चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच, आता चोरट्यांनी शहरातील यमुनाई नगर परिसरातील एका बंद घरावर डल्ला मारत ६ तोळे सोन्याचे दागिने आणि ₹८५ हजारांची रोकड लंपास केली. सलग घडणाऱ्या या मोठ्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्तीच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, यमुनाई नगर येथील रहिवासी जयसिंग आनंदसिंग गिरासे हे शनिवारी सायंकाळी पत्नीसह शहादा तालुक्यातील टेंभे येथे सासरवाडीला गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटे, पलंग आणि इतर साहित्याची संपूर्ण उलथापालथ करून चोरट्यांनी ६ तोळे सोन्याचे दागिने तसेच ₹८५ हजारांची रोकड लंपास केली.रविवारी सकाळी शेजाऱ्यांना घराचे तुटलेले कुलूप आणि उघडा दरवाजा दिसताच त्यांनी तातडीने जयसिंग गिरासे यांना तसेच पोलिसांना माहिती दिली. गिरासे दांपत्य घरी परतल्यानंतर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि आयुष्यभराची साठवण लुटल्याचे पाहून त्यांचा आक्रोश पाहून परिसरातील नागरिकही भावूक झाले.विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच शहरातील गुरुकृपा मोबाईल शॉपमध्ये तब्बल ₹५२ लाखांची चोरी झाल्यानंतरही चोरट्यांनी पुन्हा मोठा हात मारल्याने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “शहरात नेमकी सुरक्षा कुठे आहे? चोरटे इतके बिनधास्त कसे?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली रोकडे या आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.सलग घडणाऱ्या मोठ्या चोऱ्यांमुळे तळोदा शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या चोरट्यांना तातडीने जेरबंद करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे मोठे आव्हान आता तळोदा पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
![]()
