सत्यध्येय एकविचार | विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे जाळपोळ करून दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या प्रकरणातील तीन महिन्यांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) गुप्त माहितीच्या आधारे शिताफीने अटक केली आहे. या कारवाईमुळे बहुचर्चित जाळपोळ प्रकरणाच्या तपासाला मोठे यश मिळाले असून उर्वरित आरोपींच्या हालचालींवरही पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री १.२४ वाजण्याच्या सुमारास आरोपी शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख, बबलू जयसिंग लोंढे, राकेश विशाल आल्हाट, करण उर्फ बुट्या भांडाळकर, विक्रम उर्फ बाबा सुधाकर आंग्रे आणि बालू तेलधुने (सर्व रा. घोडेगाव, ता. नेवासा) यांनी फिर्यादी सचिन साहेवा फुलमाळी यांच्या घरासमोर रस्त्यावरून ज्वलनशील पेट्रोल टाकून आग लावली. या घटनेत फिर्यादीची मोटारसायकल व जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले. फिर्यादीमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडविल्याचा आरोप आहे.या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३७/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३२४(५), ३२४(६) तसेच तपासादरम्यान कलम १११ अन्वये वाढीव कलमे लागू करण्यात आली आहेत. या गुन्ह्यातील बबलू जयसिंग लोंढे व विक्रम उर्फ बाबा सुधाकर आंग्रे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, मनोज साखरे, प्रशांत राठोड तसेच चालक भगवान धुळे यांनी तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढला.११ जुलै २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार घोडेगाव येथील मिरी रोड चर्च परिसरात सापळा रचण्यात आला. तेथे संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे राकेश विशाल आल्हाट (वय २३) व मयूर उर्फ वालू रविंद्र तेलधुने (वय २१) अशी सांगितली. विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी साथीदारांसह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी सोनई पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.ही संपूर्ण कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, मनोज साखरे, प्रशांत राठोड आणि चालक भगवान धुळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या धडक कारवाईमुळे तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपींना अखेर कायद्याच्या कचाट्यात आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
![]()
