सत्यध्येय एकविचार | धुळे प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यात अवैध शस्त्रांवर सुरू असलेल्या विशेष मोहिमेला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार अवैध शस्त्रधारक व शस्त्र विक्रेत्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), धुळे यांनी अत्यंत नियोजनबद्ध व धाडसी कारवाई करत विना परवाना गावठी कट्टा (पिस्टल) विक्रीसाठी आलेल्या दोघा आरोपींना रंगेहात जेरबंद केले आहे.दि. 13 जुलै 2026 रोजी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एलसीबीच्या पथकाने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अभय कॉलेज परिसरात सापळा रचला.या कारवाईत सोमनाथ भिका पाटील (वय 32, रा. देवभाने, ता. जि. धुळे) व दिपक दगडू जगताप (वय 25, रा. साई प्रसाद कॉलनी, अभय कॉलेजजवळ, धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले. तपासणीदरम्यान त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा (पिस्टल) मॅगझीनसह तसेच 3 जिवंत काडतुसे असा एकूण ₹43 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ₹40,000 किंमतीचा गावठी कट्टा (पिस्टल) मॅगझीनसह आणि ₹3,000 किंमतीची 3 जिवंत काडतुसे यांचा समावेश आहे.प्राथमिक तपासात मुख्य आरोपी सोमनाथ भिका पाटील हा आरोपी दिपक दगडू जगताप याला सदर शस्त्र विक्री करण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच कारवाई करून संभाव्य गंभीर गुन्हा रोखण्यात यश मिळविले.या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3/25, 5 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या 20 दिवसांत धुळे शहरातील ही तिसरी तर जिल्ह्यातील चौथी अवैध शस्त्रांविरोधातील कारवाई असून, अवैध शस्त्र व्यवहार करणाऱ्यांविरुद्ध धुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील गावठी कट्टा पुरविणारा मूळ पुरवठादार (Source) कोण आहे, याचाही शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून युद्धपातळीवर सुरू आहे.ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा श्री. ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे तसेच पोलीस अंमलदार सदेसिंग चव्हाण, तुषार सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, अमोल पाटील, अतुल निकम, जगदीश सूर्यवंशी आणि सिद्धार्थ निकम यांनी अत्यंत नियोजनबद्धरीत्या पार पाडली.धुळे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणारे, विक्री करणारे व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून, जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे
![]()
