सत्यध्येय एकविचार शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर शहरातील अक्षद ट्रेडिंग किराणा दुकानात झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या चार तासांत छडा लावत शिरपूर शहर पोलीस ठाण्याने दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेली ₹14,000 ची संपूर्ण रोकड हस्तगत केली आहे. वेगवान तपास, सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेली ही कारवाई पोलिसांच्या तत्परतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. 08 जुलै 2026 रोजी रात्री 8.30 ते दि. 09 जुलै 2026 रोजी सकाळी 9.30 वाजेदरम्यान फिर्यादी श्री. मनीष मोहनलाल अग्रवाल (रा. बोहरी गल्ली, बालाजी मंदिराजवळ, शिरपूर) यांच्या अक्षद ट्रेडिंग किराणा दुकानातून अज्ञात चोरट्यांनी ₹14,000 रोख रक्कम चोरून नेली.या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 296/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305(अ), 331(3) व 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या चार तासांत संशयित मतीन खलील तेली व मकसूद अख्तर मेहतर (दोघेही रा. लोहार गल्ली, शिरपूर) यांना ताब्यात घेतले.सखोल चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून ₹14,000 किंमतीच्या ₹100, ₹50, ₹20, ₹10, ₹5, ₹2 आणि ₹1 मूल्याच्या एकूण 2,059 भारतीय चलनी नोटा व नाणी जप्त करण्यात आली. त्यामुळे चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करण्यात यश मिळवले.या प्रभावी कारवाईमुळे शिरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.क्र. 296/2026 मधील चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्याची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या कारवाईत शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार रविंद्र आखडमल, अतुल पाटील, आरीफ तडवी, सोमा ठाकरे, सचिन वाघ, गोविंद कोळी, विनोद आखडमल, भटू साळुंके, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, प्रशांत पवार आणि मनोज महाजन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत उत्कृष्ट तपासकौशल्याचे दर्शन घडविले.शिरपूर शहर पोलिसांच्या या तातडीच्या आणि परिणामकारक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला असून, नागरिकांनीही पोलिसांच्या वेगवान तपासाचे स्वागत केले आहे.
![]()
