सत्यध्येय एकविचार | शिरपूर प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील मौजे खर्दे बुद्रुक येथे गावठाणातील सरकारी बखळ जागेवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. गावातील नागरिकांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती शिरपूर यांच्याकडे निवेदन देत दि. 31 मे 2023 रोजी मंजूर करण्यात आलेला ग्रामपंचायत ठराव क्रमांक 5 तात्काळ रद्द करून त्यास स्थगिती देण्याची मागणी केली आहे.निवेदनात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, ग्रामपंचायतीतील बहुसंख्य सदस्य एका समाजातील असल्याचा फायदा घेत 13.94 आर सरकारी गावठाण बखळ जागा संबंधित समाजासाठी “अमरधाम” म्हणून राखीव ठेवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. नागरिकांनी हा निर्णय एकतर्फी, नियमबाह्य व अधिकाराचा गैरवापर असल्याचा आरोप केला आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की, संबंधित जागा गेल्या 50 ते 60 वर्षांपासून गोरगरीब नागरिकांच्या राहणीसाठी तसेच सार्वजनिक वापरासाठी वापरली जात आहे. शासनाची आवश्यक परवानगी न घेता तसेच ग्रामसभेत कोणतीही सविस्तर चर्चा न करता ठराव मंजूर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.तसेच महसुली नोंदीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, आवश्यक शासकीय प्रक्रिया व परवानग्यांविषयी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.नागरिकांच्या मते, सार्वजनिक स्वरूपाची गावठाण जागा कोणत्याही एका समाजासाठी राखीव ठेवल्यास गावातील सामाजिक सलोखा बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या :
* दि. 31/05/2023 चा ठराव क्रमांक 5 तात्काळ रद्द करून स्थगिती द्यावी.
* 13.94 आर सरकारी बखळ जागा सार्वजनिक व गोरगरीब नागरिकांच्या रहिवासासाठी राखीव ठेवावी.
* संबंधित सरपंच, ग्रामसेवक व जबाबदार ग्रामपंचायत सदस्यांच्या भूमिकेची चौकशी करून आवश्यक कायदेशीर कारवाई करावी.
* भविष्यात गावठाण जागेबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ग्रामसभेत सर्व समाजातील नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा.
नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली असून, प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
![]()
