सत्यध्येय एकविचार | धुळे प्रतिनिधी
धुळे शहरातील सुरत बायपास रोडलगत असलेल्या सिंचन कॉलनीतील नागरिकांनी त्यांच्या हक्काच्या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत प्रशासनाचे लक्ष वेधले. कॉलनीला मुख्य रस्त्याशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग अतिक्रमण करून बंद करण्यात आल्याने शेकडो नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, तातडीने अतिक्रमण हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सुरत बायपास रोडवरील सर्व्हे क्रमांक ७६/२-ब मधील सिंचन कॉलनीला मुख्य रस्त्याशी जोडणारा सार्वजनिक मार्ग काही व्यक्तींनी बेकायदेशीररीत्या अतिक्रमित करून बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांचा दैनंदिन प्रवास अक्षरशः खोळंबला असून, अनेकांना खासगी प्लॉटमधून जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हा केवळ रस्त्याचा प्रश्न नसून नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा गंभीर विषय आहे. रस्ता बंद झाल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दल तसेच इतर अत्यावश्यक सेवांनाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.निदर्शनानंतर नागरिकांनी प्रशासनाला इशाराही दिला की, योग्य कालावधीत अतिक्रमण हटविण्याची कारवाई झाली नाही, तर अधिक तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. प्रशासनाने त्वरित महसूल विभागाकडून जागेची मोजणी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी आणि नागरिकांचा हक्काचा रस्ता कायमस्वरूपी खुला करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.या निवेदनावर महेंद्र सूर्यवंशी, प्रकाश पाटील, तुळशीराम बागुल, स्वप्नील महाजन, सचिन पाटील, जितेंद्र अहिर, संजय महाले, किशोर पाटील, शांताराम पाटील, दिनकर सोनवणे, विनोद सूर्यवंशी, सचिन दाभाडे, गणेश चौरे, योगेश बागुल, तुकाराम महाले, काशिनाथ जगताप, अनघा सूर्यवंशी, साहेबराव पाटील, विलास भारती यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रशासन आता नागरिकांच्या मागणीवर किती तत्परतेने कारवाई करते, याकडे सिंचन कॉलनीसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
![]()
