सत्यध्येय एकविचार | मेहुणबारे (ता. चाळीसगाव) प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथे अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून घरातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत मेहुणबारे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अँट्रॉसिटी अँक्ट ) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. जळगाव येथील विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजल्यापासून ते २ जुलैच्या मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान, खेडगाव येथील राहत्या घरातून अल्पवयीन मुलीला विकी आप्पा सोनवणे याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप आहे. मुलगी अचानक बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली; मात्र ती न सापडल्याने अखेर पीडित मुलीच्या आईने मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विकी आप्पा सोनवणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३७(२), ९६ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत ५ जुलै २०२६ रोजी आरोपीला अटक केली.त्यानंतर ६ जुलै रोजी आरोपीला जळगाव येथील विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला १० जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या काळात आरोपीकडून सखोल चौकशी करून अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास मोहीम हाती घेतली आहे.या अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा तपास चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड स्वतः करत असून, मुलीचा सुरक्षित शोध लावण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत. आरोपीने मुलीला नेमके कुठे ठेवले आहे, याचा कसून तपास सुरू आहे.घटनेनंतर खेडगाव व परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा गंभीर घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
![]()
