सत्यध्येय एकविचार | एरंडोल प्रतिनिधी
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एरंडोल शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एरंडोल पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी व्यापक दंगा नियंत्रण सराव (मॉकड्रिल) आणि रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. रंगारी पूल व चुनाभट्टी परिसरात दुपारी सुमारे ३.४५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा सराव अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून पोलिसांनी रूट मार्च काढत नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली, तर कायदा हातात घेणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे कठोर इशारा दिला.संवेदनशील परिस्थितीत पोलिसांची तत्परता आणि समन्वयाची क्षमता तपासण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मॉकड्रिलमध्ये दंगल नियंत्रण, जमाव पांगविण्याच्या आधुनिक पद्धती, आपत्कालीन प्रतिसाद, बचावकार्य आणि समन्वय यांचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला. कोणतीही अनुचित घटना घडल्यास पोलीस यंत्रणा किती वेगाने आणि प्रभावीपणे प्रतिसाद देऊ शकते, याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात आले.या सरावादरम्यान एरंडोल नगरपरिषदेचे अग्निशमन दल, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय पथक तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी पूर्णवेळ सज्ज ठेवण्यात आली होती. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्याची प्रशासनाची तयारी स्पष्टपणे दिसून आली.हा सराव अधिक प्रभावी करण्यासाठी अमळनेर उपविभागातील विविध पोलीस ठाण्यांचे मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. पारोळा पोलीस ठाण्याचे एक अधिकारी व पाच अंमलदार प्रत्यक्ष सरावात सहभागी झाले होते, तर धरणगाव पोलीस ठाण्याचे एक अधिकारी व चार अंमलदार राखीव पथक म्हणून सज्ज ठेवण्यात आले होते. एरंडोल पोलीस ठाण्याचे तीन अधिकारी आणि २२ अंमलदारांनी प्रत्यक्ष दंगा नियंत्रण सरावात सहभाग घेतला.सरावानंतर पोलिसांनी रंगारी पूल, चुनाभट्टी, भगवा चौक, नथ्थू बापू दर्गा आणि मरीमाता चौक या प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध रूट मार्च काढला. या संचलनाद्वारे नागरिकांना शांतता, सामाजिक सलोखा आणि कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच अफवा पसरविणे, कायदा हातात घेणे किंवा सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेशही या रूट मार्चमधून देण्यात आला.संपूर्ण दंगा नियंत्रण सराव आणि रूट मार्च अमळनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते आणि एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या उपस्थितीत व थेट मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.आगामी सण-उत्सवांच्या काळात नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे, सामाजिक सलोखा कायम राखावा आणि कोणतीही संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
![]()
