सत्यध्येय एकविचार अक्कलकुवा | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूच्या बेकायदेशीर व्यापारावर अक्कलकुवा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोठा घाव घालत सुमारे ₹४.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरीपाडा फाट्याजवळ सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत ₹१,६९,३७० किमतीचा प्रतिबंधित विमल पान मसाला, शक्ती तंबाखू व इतर तंबाखूजन्य पदार्थांचा साठा, तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टाटा इंडिगो कार (MH-03-J-3111) जप्त करण्यात आली. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित गुटखा व तंबाखूची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे १३ जुलै रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अक्कलकुवा पोलीस व अन्न सुरक्षा विभागाच्या संयुक्त पथकाने पिंपरीपाडा फाट्यावर सापळा रचला.दरम्यान, संशयास्पद टाटा इंडिगो कार अडवून तपासणी केली असता वाहनातून शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला, शक्ती तंबाखू आणि बागवान चबाने की तंबाखू मोठ्या प्रमाणावर आढळून आला. विक्रीच्या उद्देशाने हा प्रतिबंधित साठा बाळगल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महेंद्र शांतीलाल जैन (वय ४६, रा. मोलगी, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) याला ताब्यात घेण्यात आले.अन्न सुरक्षा अधिकारी सुरेंद्र रोहिदास डोले यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक अशीत कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, उपनिरीक्षक धिरसिंग वसावे, एएसआय राकेश कापडणीस, हवालदार आदिनाथ गोसावी, अजित गावित व मयुर माळी यांच्या पथकाने केली. पुढील तपास उपनिरीक्षक धिरसिंग वसावे करीत आहेत.
![]()
