सत्यध्येय एकविचार | पिंपळनेर (प्रतिनिधी)
पिंपळनेर शहरात एका खासगी रुग्णालयात प्रसूतीनंतर २५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी संबंधित रुग्णालयावर दगडफेक करत निषेध व्यक्त केला. परिस्थिती तणावपूर्ण बनताच पिंपळनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.मृत महिलेचे नाव पूनम सॉन्या अहिरे (वय २५, रा. देगाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूनम अहिरे यांना प्रसूतीसाठी पिंपळनेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळच्या सुमारास त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर काही वेळातच त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.महिलेच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांनी उपचारात गंभीर हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला. काही वेळातच देगावसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर जमा झाले. वाढत्या तणावादरम्यान जमावातील काही व्यक्तींनी रुग्णालयावर दगडफेक केली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. रुग्णालयात इतर रुग्णांवर उपचार सुरू असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तसेच स्थानिक नागरिकांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. त्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्ववत झाली.दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही नागरिकांनीही उपचारपद्धतीबाबत गंभीर आरोप केले असून, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी जोर धरत आहे.या घटनेनंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून, मृत्यूचे नेमके कारण, उपचारांची प्रक्रिया आणि नातेवाईकांनी केलेल्या आरोपांची सर्व बाजूंनी चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
![]()
