सत्यध्येय एकविचार | धुळे प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत तब्बल १२ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ३ लाख रुपयांचा गांजा, ५० हजार रुपयांची दुचाकी असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहरात गांजाची विक्री करण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडल्याने अमली पदार्थांच्या अवैध साखळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.पोलिस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, धुळे शहरातील डी-मार्टजवळील विश्वकर्मा भवन परिसरात दोन युवक मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन येणार असून त्याची विक्री करण्याच्या तयारीत आहेत. माहितीची खातरजमा करून एलसीबीच्या विशेष पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला.१५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकत संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची चाहूल लागताच दोघांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत त्यांना ताब्यात घेतले.चौकशीत आरोपींची ओळख निखिल गोकुळ पाटील (वय २५, रा. छोरिया नगर, डी-मार्टजवळ, धुळे) आणि चेतन जीवन पावरा (वय २१, रा. सैनिक कॉलनी, नगावबारी, धुळे) अशी झाली. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्यांच्या ताब्यातून १२ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तसेच एमएच-१८/बीके-०३११ क्रमांकाची दुचाकीही जप्त करण्यात आली.पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत ३ लाख रुपये, तर दुचाकीची किंमत ५० हजार रुपये असून, एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०९/२०२६ नोंद करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act), १९८५ अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा आरोपींकडे कोठून आला, त्याचा पुरवठादार कोण आहे, हा माल कोणाला विकला जाणार होता, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि या अवैध व्यवहारामागील मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा सखोल तपास पोलिसांनी सुरू केला आहे.ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, तसेच पोलिस अंमलदार आरिफ पठाण, राहुल सानप, संदीप जगन्नाथ पाटील, देवेंद्र ठाकूर, अमोल पाटील आणि सिद्धार्थ निकम यांच्या पथकाने पार पाडली.धुळे जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली असून, युवकांना ड्रग्जच्या विळख्यात ढकलणाऱ्या रॅकेटविरोधात आगामी काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
![]()
