सत्यध्येय एकविचार | धुळे प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यात गुंगीकारक औषधे व अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) आणखी एक मोठे यश मिळवत कोडीनयुक्त कफ सिरपच्या काळाबाजारावर मोठा घाव घातला आहे. मोराणे (ता. जि. धुळे) परिसरात महामार्गावर सापळा रचून पोलिसांनी १४२ बाटल्या कोडीनयुक्त कफ सिरप जप्त करत एकाला अटक केली. या प्रकरणी एनडीपीएस कायदा, औषध व सौंदर्यप्रसाधन अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या अवैध साखळीमागील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शकील सैय्यद दाऊद (वय ३६, रा. नोमाणी नगर, मालेगाव, जि. नाशिक) असे आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीकडे गुंगीकारक औषधांचा साठा बाळगण्याचा किंवा विक्री करण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ही औषधे बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी आणण्यात आल्याचा संशय अधिक बळावला आहे.धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी अमली पदार्थ, गुंगीकारक औषधे व युवकांच्या आरोग्यास घातक ठरणाऱ्या पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना १५ जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली की, मालेगाव येथून एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात कोडीनयुक्त कफ सिरप घेऊन मोराणे परिसरात विक्रीसाठी येणार आहे. माहितीची खातरजमा करून विशेष पथकाने तातडीने कारवाई करत महामार्गावर सापळा रचला.वाहनाची तपासणी केली असता आरोपीच्या ताब्यातून १०० मिली क्षमतेच्या १२० सीलबंद बाटल्या (किंमत ₹२२,२००) तसेच १०० मिली क्षमतेच्या आणखी २२ सीलबंद बाटल्या (किंमत ₹२,५३०) असा एकूण १४२ बाटल्यांचा कोडीनयुक्त कफ सिरपचा साठा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹२४,७३० इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी आरोपीविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०३/२०२६ नोंद करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे, एनडीपीएस अधिनियम १९८५ मधील कलम ८(क), २१(क) तसेच औषध व सौंदर्यप्रसाधन अधिनियम १९४० मधील कलम १८(क) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.पोलिसांचा तपास आता केवळ आरोपीपुरता मर्यादित नसून, हे गुंगीकारक औषध कोठून आणले गेले, कोणाला विकले जाणार होते, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि जिल्ह्यात अशा प्रकारचे जाळे किती व्यापक आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. युवकांमध्ये कोडीनयुक्त कफ सिरपचा वाढता गैरवापर लक्षात घेता, अशा अवैध विक्रेत्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अमित मोरे तसेच पोलिस अंमलदार शशिकांत देवरे, मुकेश वाघ, धर्मेंद्र मोहिते, सुशिल रोंडे आणि विवेक वाघमोडे यांनी या यशस्वी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
![]()
