सत्यध्येय एकविचार | धुळे प्रतिनिधी
धुळे शहरात रात्रगस्तीदरम्यान धुळे शहर पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मंदिरात चोरी करून पसार होणाऱ्या आरोपीला पाठलाग करून रंगेहात अटक करण्यात यश मिळाले आहे. डायल 112 वर चोरीची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसरात शोधमोहीम राबवली आणि काही मिनिटांतच आरोपीला चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. या कारवाईमुळे शहर पोलिसांच्या वेगवान प्रतिसादाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 16 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 3.05 वाजता डायल 112 वर दसेरा मैदान परिसरातील पूर्वमुखी हनुमान मंदिरात चोरी झाल्याचा संदेश प्राप्त झाला. माहिती मिळताच धुळे शहर पोलीस ठाण्याचे बिट मार्शल तसेच डी.बी. पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मंदिराची पाहणी केली असता चोरी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोपीचा शोध सुरू करण्यात आला.याचवेळी मोटारसायकलवरून जात असलेले श्री. सचिन वाडीले यांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. दसेरा मैदानाकडून सहजीवन नगरकडे जाणाऱ्या भुयारी रेल्वे बोगद्याच्या रस्त्याने एक तरुण खांद्यावर पेटीसारखा संशयास्पद माल घेऊन धावत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने परिसरात नाकाबंदी करून शोधमोहीम राबवली.शोधादरम्यान पोलिसांना एक संशयित तरुण खांद्यावर दोन पेट्या घेऊन पळताना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव समीर शहा रमजान शहा (वय 19), रा. शंभर फुटी रोड, इब्राहिम मशिदजवळ, धुळे असे सांगितले. सखोल चौकशीत त्याने पूर्वमुखी हनुमान मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली.आरोपीच्या झडतीमध्ये पोलिसांनी मंदिरातील कुलूपबंद दानपेटी, एक चांदीचा मुकूट आणि दोन चांदीचे तोडे असा सुमारे ₹15,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. चोरीचा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 312/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305 व 331(4) अंतर्गत मंदिर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.या कारवाईत श्री. सचिन वाडीले यांच्या सतर्कतेमुळे आरोपीचा माग काढणे आणि त्याला मुद्देमालासह पकडणे शक्य झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.कारवाईमध्ये धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन चौधरी तसेच पोलीस अंमलदार रविकिरण राठोड, कुंदन पटाईत, महेशल मोरे, राहुल सरदार, सचिन जैतपुरे, रोहिणी पवार, अमोल पगारे, तुषार पारधी, प्रशांत नाथजोगी, अमित रनमळे, धम्मपाल वाघ, योगेश वानखेडे आणि शाहीद शेख यांनी सक्रिय सहभाग घेत आरोपीला चोरीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.धुळे शहर पोलिसांच्या या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत असून, डायल 112 वर वेळेवर माहिती देणे आणि नागरिकांची सतर्कता गुन्हे उघडकीस आणण्यासाठी किती महत्त्वाची ठरते, याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.
![]()
