सत्यध्येय एकविचार धुळे | प्रतिनिधी
तालुक्यातील मोघण येथे विवाहाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आणि ती गर्भवती राहिल्यानंतर कथित गर्भपातासाठी औषधे दिल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मोहाडी नगर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोघण येथील रहिवासी कैलास हिलाल माळी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, दिनेश त्र्यंबक माळी (रा. मोघण, ता. धुळे) याने त्यांच्या मुली सत्यमबाई कैलास माळी हिला विवाहाचे आमिष दाखवून विश्वासात घेतले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून ती गर्भवती राहिल्यानंतर गर्भपात करण्याच्या उद्देशाने आरोपीने तिला काही औषधे दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.फिर्यादीनुसार, संबंधित औषधे घेतल्यानंतर सत्यमबाईची प्रकृती अचानक खालावली. तिचा रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी झाला, तिला झटके येऊ लागले आणि ती बेशुद्ध पडली. कुटुंबीयांनी तातडीने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच दि. १३ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ४.१५ वाजता तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार मोहाडी नगर पोलीस ठाण्यात संशयित दिनेश त्र्यंबक माळी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ९०(१), ९१ आणि ९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय उपचारांची कागदपत्रे, संबंधित औषधांचा तपशील, तसेच इतर वैज्ञानिक व तांत्रिक पुरावे तपासले जात असून, त्याआधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तपासाची सूत्रे मोहाडी नगर पोलीसांकडे असून, सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे.या घटनेमुळे मोघण गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
![]()
