सत्यध्येय एकविचार | नंदुरबार प्रतिनिधी
ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांची अत्यंत शिताफीने फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा नंदुरबार शहर पोलिसांनी भांडाफोड करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत १० एलईडी टीव्ही, पॅनासोनिक कंपनीचा एसी, गिझर, स्मार्ट होम थिएटर, मॉप सेट असा सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणामुळे ऑनलाइन खरेदीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपी ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांच्या ग्राहकांसाठी आलेल्या पार्सलमधील नवीन आणि महागड्या वस्तू काढून त्याऐवजी त्याच प्रकारच्या जुन्या किंवा निकृष्ट वस्तू ठेवत होते. ग्राहकांना चुकीचा माल मिळाल्याने ते संबंधित पार्सल कंपनीकडे परत पाठवत होते. मात्र, या संपूर्ण प्रकारात ग्राहकांसह ई-कॉमर्स कंपनीचेही मोठे आर्थिक नुकसान होत होते.ही धक्कादायक माहिती दि. १२ जुलै २०२६ रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आनंदा मराठे व राकेश मोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक माहिती, गुप्त तपास आणि चौकशीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर संपूर्ण रॅकेट उघडकीस आले.तपासादरम्यान फ्लिपकार्टचे नंदुरबार येथील व्यवस्थापक आरिफ हुसेन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता, अशा स्वरूपाच्या ग्राहकांच्या अनेक तक्रारी यापूर्वीही प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. संबंधित कर्मचाऱ्यांकडून झालेल्या नुकसानीची रक्कम त्यांच्या वेतनातून वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रकरणी पर्वेज मोहम्मद, सुफियान रज्जाक मणियार आणि राज विनोद मराठे (रा. नंदुरबार) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३१६(४) व ३(५) अन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपींनी विक्री केलेल्या वस्तूंचा माग काढत नंदुरबार जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून १० एलईडी टीव्ही, पॅनासोनिक एसी, गिझर, स्मार्ट होम थिएटर आणि मॉप सेट असा सुमारे ₹६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, तसेच इतर जिल्ह्यांपर्यंत या रॅकेटचे धागेदोरे पोहोचले आहेत का, याचाही तपास सुरू आहे.
नागरिकांना पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन
नंदुरबार शहर पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन खरेदी करताना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पार्सल स्वीकारताना त्याची खात्री करून घ्यावी, तसेच अत्यल्प किमतीत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या महागड्या वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्या वस्तू चोरीच्या, अपहार केलेल्या किंवा फसवणुकीतून मिळालेल्या नाहीत याची खात्री करावी. कोणताही संशयास्पद व्यवहार किंवा माहिती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.ही उल्लेखनीय कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीष कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, भुणेश मराठे, पोलीस हवालदार जगदीश पाटील, प्रशांत पाटील तसेच आनंदा मराठे, राहुल राठोड, अनिल वसावे, रुपेश पगारे, राजेंद्र कटके, ललित गवळी, अमित भरवाड आणि निंबाबाई वाघमोडे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख करीत आहेत.
![]()
