सत्यध्येय एकविचार | नंदुरबार प्रतिनिधी
यंदाच्या अपुऱ्या व विस्कळीत मान्सूनमुळे नंदुरबार जिल्ह्यात गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेती, पिण्याचे पाणी, पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्याला तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पेरणीच्या हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्याने हजारो हेक्टरवरील पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून केलेली पेरणी पावसाअभावी वाया गेल्याने त्यांच्यासमोर दुबार पेरणीचे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यातील विहिरी, बोअरवेल, नाले आणि तलावांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पशुधनासाठी चाऱ्याची कमतरता भासत असून शेती ठप्प झाल्याने ग्रामीण बाजारपेठा आणि छोटे व्यापारीही आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनाद्वारे शासनाकडे नंदुरबार जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा, बियाणे व खतासाठी विशेष अनुदान द्यावे, शेतकऱ्यांची कर्जमाफी व कर्जवसुलीला स्थगिती द्यावी, करपलेल्या पिकांसाठी तातडीने आर्थिक नुकसानभरपाई जाहीर करावी, दुबार पेरणीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत, पशुधनासाठी चारा छावण्या उभाराव्यात तसेच मनरेगा व इतर रोजगार हमी योजनांद्वारे ग्रामीण भागात तातडीने रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख पंडित माळी यांनी, “पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडला आहे. शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून मदत केली नाही, तर परिस्थिती अधिक गंभीर होईल. वेळेत मदत मिळाल्यासच शेतकरी पुन्हा उभा राहू शकतो,” असे प्रतिपादन केले.या प्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख सागर पाटील, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बापू महाजन, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाप्रमुख इम्तियाज पटेल, तालुकाध्यक्ष रमेश पाटील, युवा सेना उपजिल्हाप्रमुख दिनेश भोपे, शहराध्यक्ष शेखर जाधव, मुन्ना शिकलीकर, खंडू माळी, इम्तियाज पठाण यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
