सत्यध्येय एकविचार धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरातील द्वारकामाई लॉजमध्ये घडलेल्या कोट्यवधींच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा आझादनगर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. व्यापाऱ्याच्या ताब्यातील ₹१.५५ कोटी किमतीचे, एक किलो ६१२ ग्रॅम वजनाचे विविध डिझाईनचे सोन्याचे दागिने सुरक्षित हस्तगत करण्यात आले असून, चोरीप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.फिर्यादी अश्विनभाई दुर्लभजीभाई काचलिया (वय ६५, रा. जुनागढ, गुजरात) हे सराफ व्यावसायिक असून, धुळे येथील सराफ व्यापाऱ्यांना दागिने विक्रीसाठी आले होते. त्यांनी द्वारकामाई लॉजमधील खोली क्रमांक २१ मध्ये मुक्काम केला होता. दि. १७ जुलै रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ७.३० वाजेदरम्यान त्यांनी सोन्याचे दागिने एका बॅगेत ठेवून खोलीला कुलूप लावले आणि व्यापाऱ्यांकडे ऑर्डर घेण्यासाठी बाहेर गेले. परत आल्यानंतर खोलीचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी पाहणी केली असता दागिन्यांची बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तातडीने विशेष तपास पथक तयार केले. घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण, तसेच तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हितेश सुरेश सोनी (वय ४२, रा. प्लॉट क्र. २७, गुलाबजी भवनजी कंपाउंड, मालेगाव रोड, धुळे) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीतील ₹१.५५ कोटी किमतीचे एक किलो ६१२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. त्यामुळे व्यापाऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान टळले.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर तसेच पोलीस अंमलदार गौतम सपकाळे, योगेश शिरसाठ, रफीक पठाण, शांतीलाल सोनवणे, संदीप कढरे, मनोज बागुल, विजय शिरसाठ, योगेश शिंदे, अनिल शिंपी, मकसुदखान पठाण आणि पंकज जोंधळे यांनी मोलाची भूमिका बजावली.प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील करीत असून, अवघ्या सहा तासांत कोट्यवधींचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपीला जेरबंद केल्याबद्दल आझादनगर पोलिसांच्या तत्पर व प्रभावी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
![]()
