सत्यध्येय एकविचार अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मुंगी गावात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत वाळू माफियांना मोठा दणका दिला आहे. या कारवाईत शासनाच्या मालकीची चोरीची वाळू, दोन डंपर आणि एक ट्रॅक्टर-लोडरसह एकूण ₹३४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील दोन वाहनमालक फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.पोलीस अधीक्षक मा. श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झेड. गांबरे, भीमराज खर्से, राहुल डोके आणि बाळासाहेब गुंजाळ यांचे विशेष पथक तयार करून कारवाईसाठी रवाना करण्यात आले.दि. २० जुलै २०२६ रोजी पहाटे हे पथक शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मुंगी गावातील नदीपात्रातून शासनाच्या मालकीची वाळू चोरी करून ती भोण्याई देवी मंदिरासमोरील सिमेंट रस्त्यावर साठवण्यात आली असून ट्रॅक्टर-लोडरच्या सहाय्याने दोन डंपरमध्ये भरून तिची अवैधरित्या वाहतूक सुरू आहे.माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी अचानक छापा टाकला. त्यावेळी लाल रंगाच्या ट्रॅक्टर-लोडरच्या सहाय्याने दोन पांढऱ्या रंगाच्या डंपरमध्ये वाळू भरली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून घटनास्थळावरून बाळासाहेब शिवाजी वाल्हेकर (वय ३२), सोमनाथ अशोक आदमाने (वय ३५) आणि संदीप राजेंद्र सोलाट (वय १९), सर्व रा. मुंगी, ता. शेवगाव यांना ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान आरोपी बाळासाहेब वाल्हेकर याने त्याच्या ताब्यातील डंपरचा मालक त्र्यंबक भानुदास रक्टे (रा. मुंगी, ता. शेवगाव) असल्याचे सांगितले. आरोपी सोमनाथ आदमाने याने दुसऱ्या डंपरचा मालक विजय आसाराम हुगे (रा. मुंगी, ता. शेवगाव) असल्याची माहिती दिली. तसेच आरोपी संदीप सोलाट याने ट्रॅक्टर-लोडर हा देखील विजय आसाराम हुगे यांचाच असल्याचे सांगितले. त्र्यंबक भानुदास रक्टे आणि विजय आसाराम हुगे हे दोघेही सध्या फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.या कारवाईत पोलिसांनी ४ ब्रास वाळू (किंमत ₹८० हजार), दोन डंपर (किंमत ₹२८ लाख) आणि एक ट्रॅक्टर-लोडर (किंमत ₹६ लाख) असा एकूण ₹३४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी पोलीस अंमलदार बाळासाहेब अशोक गुंजाळ (स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेवगाव पोलीस ठाणे करीत आहे.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झेड. गांबरे, भीमराज खर्से, राहुल डोके आणि बाळासाहेब गुंजाळ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या धडक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
![]()
