सत्यध्येय एकविचार नेवासा | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर पाऊल उचलत नेवासा पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा डंपर पकडून ₹८ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून वाहनमालक फरार आहे.जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डीले आणि प्रकाश मांडगे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.दि. २० जुलै २०२६ रोजी रात्री हे पथक नेवासा पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत गस्त घालत असताना संत गाडगेबाबा शाळेजवळ नेवासा फाट्याकडून भानसहिवरा गावाच्या दिशेने जाणारा पांढऱ्या-लाल रंगाचा डंपर संशयास्पदरीत्या जाताना आढळला. पथकाने तात्काळ वाहन अडवून तपासणी केली असता, डंपरमध्ये कोणत्याही वैध परवान्याशिवाय शासनाच्या मालकीची वाळू वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव रोहीदास गुलाब जाधव (वय ३१, रा. गंगानगर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे सांगितले. पुढील चौकशीत सदर डंपर हा कैलास पवार (पूर्ण नाव उपलब्ध नाही), रा. गंगानगर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर याच्या मालकीचा असल्याचे समोर आले. कैलास पवार हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून ३ ब्रास वाळू (किंमत ₹३०,०००) तसेच डंपर (किंमत ₹८,००,०००) असा एकूण ₹८,३०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार प्रकाश नवनाथ मांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ६२८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास नेवासा पोलीस ठाणे करीत आहे.सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे तसेच पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डीले आणि प्रकाश मांडगे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.अवैध वाळू माफियांविरोधात जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या या कारवायांमुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून अशा बेकायदेशीर कृत्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत.
![]()
