सत्यध्येय एकविचार शिरपूर | प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील विविध गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. उपजिल्हा प्रमुख भगतसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना शहर प्रमुख बबलू शेख यांच्या पुढाकाराने हे निवेदन सादर करण्यात आले.शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा वेळेवर मिळत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विशेषतः गरोदर महिलांसाठी अत्यावश्यक असलेली २४ तास सिझेरियन प्रसूतीची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचेही नमूद करण्यात आले.निवेदनाद्वारे रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ तसेच आवश्यक वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. तसेच रुग्णालयाच्या इमारतीची दयनीय अवस्था, गळके छत, जीर्ण भिंती आणि अपुऱ्या सुविधा यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे इमारतीची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, प्रशासनाने या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन ठोस कार्यवाही करावी. अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल आणि त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.यावेळी भरत राजपूत, बबलू शेख, राजू टेलर्स, अभय भदाणे, जितेंद्र पाटील, देवाजी, वाजिद मलक, मोबीन पठाण, अरबाज तेली, शाहरूख मन्सुरी, सद्दाम मन्सुरी, शरीफ मन्सुरी, शाहीद सैय्यद, शाहीद शाह, साहील तेली, साहील शाह, शोएब पिंजारी, मुबारक पिंजारी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.शिरपूर शहरातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी पुन्हा एकदा जोरकसपणे करण्यात आली.
![]()
