सत्यध्येय एकविचार अहिल्यानगर | प्रतिनिधी
घोडेगाव (ता. नेवासा) येथे पेट्रोल टाकून जाळपोळ करत परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि तब्बल तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या मुख्य आरोपीला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील आणखी एका आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेस सामोरे जावे लागणार असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या धडक कारवाईची सर्वत्र चर्चा होत आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १.२४ वाजण्याच्या सुमारास घोडेगाव येथील सचिन साहेबा फुलमाळी यांच्या घराबाहेर काही आरोपींनी संगनमताने पेट्रोलसारखा ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. या घटनेत फिर्यादीची मोटारसायकल तसेच जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ही घटना घडविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.या प्रकरणी फिर्यादी सचिन साहेबा फुलमाळी (रा. घोडेगाव, ता. नेवासा) यांच्या तक्रारीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३७/२०२६ दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३२४(५), ३२४(६) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपासादरम्यान कलम १११ हे वाढीव कलमही लागू करण्यात आले आहे.या गुन्ह्यातील आरोपी बबलू जयसिंग लोंढे, विक्रम उर्फ बाबा सुधाकर आंग्रे, राकेश विशाल आल्हाट आणि मयूर उर्फ बालू रविंद्र तेलधुने यांना यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. मात्र, मुख्य आरोपी शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख हा गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता.दरम्यान, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे तसेच पोलीस अंमलदार फुरकान शेख, विष्णू भागवत, राहुल डोके, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब खेडकर व चालक प्रदीप शेळके यांच्या विशेष पथकाने आरोपीचा कसून शोध सुरू ठेवला होता.२३ जुलै २०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मोरे चिंचोरा (ता. नेवासा) परिसरात असल्याचे समजताच पथकाने तातडीने सापळा रचून शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख (वय २८, रा. घोडेगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने आपल्या साथीदारांसह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी सोनई पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास तेथील पोलीस करीत आहेत.ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
![]()
