सत्यध्येय एकविचार नंदुरबार प्रतिनिधी :
शहरातील चिराग गल्ली परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत घराच्या छतावर लपवून ठेवलेल्या ७ धारदार लोखंडी तलवारी जप्त केल्या. जप्त तलवारींची अंदाजे किंमत ₹२४ हजार असून, या प्रकरणी अदनान खान सफदर खान पठाण (वय ३०, रा. चिराग गल्ली, नंदुरबार) याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता चिराग गल्ली परिसरात ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पथकाने संशयिताच्या राहत्या घरावर छापा टाकून झडती घेतली. यावेळी घराच्या छतावर लपवून ठेवलेल्या सात धारदार लोखंडी तलवारी पोलिसांच्या निदर्शनास आल्या. पोलिसांनी पंचनामा करून सर्व तलवारी ताब्यात घेतल्या.अवैधरित्या धारदार शस्त्रे बाळगल्याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, ही शस्त्रे कुठून आणण्यात आली, कोणत्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आली होती तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, या दिशेने पोलिसांकडून तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार, दिनेश चित्ते, जितेंद्र पाडवी, सुनील येलवे, मुकेश तांबे, मोहन ढमढेरे, चेतन साळवे, मनोज महाजन, विनोद पाटील, रामेश्वर चव्हाण, हेमंत बारी, कल्पेश मोरे आणि अभय राजपूत यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
