सत्यध्येय एकविचार दोंडाईचा प्रतिनिधी
दोंडाईचा, दि. ११ ऑगस्ट २०२६ : अन्न व औषध प्रशासन, धुळे पथकाने दोंडाईचा शहरातील खाद्यपदार्थ व तेल विक्री करणाऱ्या पाच आस्थापनांची तपासणी करून मोठी कारवाई केली. या कारवाईत विविध खाद्यपदार्थ व तेलांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून, अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील तरतुदींचे उल्लंघन आढळल्याने २,९६० किलो रिफा सोयाबीन तेलाचा तब्बल ₹५ लाख ८९ हजार किमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच एका ऑइल मिलचा अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे.शहादा बायपास रोडवरील संतोष ट्रेडर्स येथे तपासणीदरम्यान रिफा सोयाबीन तेल ‘साई स्वाद’चे दोन नमुने तसेच ‘लकी लाईट’ रिफा सोयाबीन तेलाचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. कायद्याचे उल्लंघन आढळल्याने उर्वरित २,९६० किलो तेलसाठा, किंमत ₹५,८९,०००, जप्त करण्यात आला.स्टेशन रोडवरील कमला ऑइल मिल येथे ‘कमला’ शेंगदाणा तेलाचा नमुना घेण्यात आला. अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील परिशिष्ट-४च्या तरतुदींचे उल्लंघन आढळल्याने संबंधित आस्थापनाचा अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला.याच कारवाईदरम्यान महावीर ऑइल व दाल मिल येथून शेंगदाणा व ‘गोल्ड कॉइन’ शेंगदाणा तेलाचे, तर कैलाश ट्रेडर्स येथून संभार मसाला, सब्जी मसाला, सोनपरी भगर आणि चिंग्स वेज मंचुरियन मिक्स मसाला यांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तसेच हॉटेल प्रिंस येथे विदेशी मद्याचे नमुनेही घेण्यात आले.सर्व नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित आस्थापनांविरोधात कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे दोंडाईचा परिसरातील खाद्यतेल व खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये या धडक कारवाईने खळबळ उडाली आहे.ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) गो. वी. माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, अरविंद राऊत व मंगेश भावसार यांनी केली.
![]()
