सत्यध्येय एकविचार शहादा प्रतिनिधी:
महाराष्ट्रात परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्यवाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहादा तालुक्यातील खेडदिगर सीमा तपासणी नाक्यावर मोठी कारवाई करत तस्करांना जोरदार दणका दिला आहे. १७ आणि १८ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल २३ लाख ६५ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खेडदिगर सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीत गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला ७३५ बल्क लिटर म्हणजेच ८५ खोके मद्य, तसेच मध्य प्रदेशातील १८० बल्क लिटर म्हणजेच १५ खोके बिअर असा मोठा परराज्यातील मद्यसाठा आढळून आला.अवैध मद्यवाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दोन चारचाकी वाहने आणि मद्यसाठा असा एकूण २३ लाख ६५ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल विभागाने ताब्यात घेतला. या प्रकरणी खेडदिगर राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सीमावर्ती भागातून परराज्यातील मद्य महाराष्ट्रात आणून त्याची अवैध विक्री किंवा वाहतूक करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईमुळे अवैध मद्यतस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सीमा तपासणी नाक्यांवरील तपासणी अधिक कडक करण्याची गरजही या कारवाईतून अधोरेखित झाली आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त उषा वर्मा आणि अधीक्षक अमृत तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईच्या पथकात निरीक्षक राजेश सकपाळ, दुय्यम निरीक्षक एच. पी. घरटे, अ. शां. गायकवाड तसेच जवान ए. डी. पाटील, हितेश जेठे, मानसिंग पाडवी, ए. एन. अहिराव, एस. सी. बैसाणे, कपिल ठाकूर, एस. आर. चौधरी, आर. डी. साळवे, हर्षल पाटील आणि राजेश बागले यांचा समावेश होता.
![]()
