सत्यध्येय एकविचार धुळे प्रतिनिधी :
शहरात अवैध शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयितांविरोधात धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत एक गावठी कट्टा (पिस्टल), ४ जिवंत काडतुसे आणि नंबरप्लेट नसलेली रॉयल एनफिल्ड बुलेट असा एकूण ₹१ लाख ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत चौघांचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अवैध शस्त्रांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक तसेच पोलीस अधीक्षक, धुळे यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गोपनीय बातमीदारामार्फत जुने धुळे परिसरातील एका व्यक्तीच्या हातात गावठी कट्टा असल्याचा फोटो असल्याची माहिती मिळाली.माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संभाव्य गुन्हा घडण्यापूर्वीच त्याला आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी पथक तयार करून तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार LCBचे पथक धुळे शहरात रवाना झाले. पथकाने डी-मार्ट परिसरात उभ्या असलेल्या संबंधित साक्षीदाराची चौकशी केली. गावठी कट्ट्यासोबत काढलेल्या फोटोबाबत विचारणा केली असता, त्याने आपला मित्र विधी संघर्षग्रस्त बालक (वय १७ वर्षे) आणि कुंतेश प्रविण बागुल (वय २० वर्षे, रा. राजेशिव कॉलनी, धुळे) यांच्याबाबत माहिती दिली.चौकशीदरम्यान विधी संघर्षग्रस्त बालकाने पोलिसांना सांगितले की, त्याने सदर गावठी कट्टा सागर संजय जोंधळे (वय २८ वर्षे, रा. बडगुजर प्लॉट, पारोळा रोड, धुळे) याच्याकडून ₹४० हजार रुपयांना विकत घेतला होता. त्यानंतर सदर गावठी कट्टा त्याने त्याचा मित्र कुंतेश बागुल याच्याकडे ठेवला होता, अशी माहिती समोर आली.यानंतर पोलिसांनी कुंतेश प्रविण बागुल यास त्याच्या राहत्या घराजवळून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, सदर गावठी कट्टा त्याने त्याचा मित्र कल्पेश धर्मराज यादव (वय २१ वर्षे, रा. पवन नगर, चाळीसगाव रोड, धुळे) याच्याकडे दिल्याचे समोर आले.त्यानंतर पोलिसांनी कल्पेश यादव याचा शोध घेतला असता, तो रॉयल एनफिल्ड बुलेटवर फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यास बुलेटसह ताब्यात घेतले. बुलेटच्या सीटखालील कप्प्यात गावठी कट्टा ठेवलेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर कायदेशीर पद्धतीने झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये मॅग्झीनसह एक देशी गावठी कट्टा (पिस्टल) आणि ४ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी सदर शस्त्र व काडतुसे तात्काळ हस्तगत केली.या कारवाईत ₹४० हजार किमतीचा एक देशी गावठी कट्टा मॅग्झीनसह, ₹४ हजार किमतीची ४ जिवंत काडतुसे आणि ₹१ लाख किमतीची नंबरप्लेट नसलेली रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० असा एकूण ₹१ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बुलेटचा चेसीस क्रमांक ME3U3K5C1KA862419 असून इंजिन क्रमांक U3K5C1KA892610 असा आहे.या प्रकरणात चौघांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५५/२०२६ नुसार शस्त्र अधिनियम कलम ३, ७ चे उल्लंघन कलम २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.गावठी कट्टा नेमका कोणत्या माध्यमातून मिळविण्यात आला, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या शस्त्राचा यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यात वापर झाला आहे का, यासह अवैध शस्त्रांच्या खरेदी-विक्रीची साखळी तपासण्याच्या दृष्टीनेही पोलिसांकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे.अवैध शस्त्र बाळगणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा असून, अशा शस्त्रांच्या माध्यमातून दहशत किंवा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्यापूर्वीच त्यांना आळा घालण्यासाठी धुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गोपनीय माहितीतील एका फोटोचा धागा पकडत चौकशीची साखळी पुढे नेऊन अखेर बुलेटच्या सीटखालून गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याने LCBच्या कारवाईचे विशेष कौतुक होत आहे.ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, प्रभारी अधिकारी, सपोनि. दिपक ढोके, पोउनि. अमरजित मोरे तसेच पोलीस अंमलदार सदेसिंग चव्हाण, शिरीष भदाणे, महेंद्र सपकाळ, अतुल निकम आणि नरेंद्रसिंग गिरासे यांच्या पथकाने केली.
![]()
