सत्यध्येय एकविचार शिरपूर प्रतिनिधी :
अतिदुर्गम भागाचा फायदा घेत वनविभागाच्या जमिनीवर कपाशी व तुरीच्या पिकामध्ये कॅनाबीस (गांजा सदृश्य अंमली पदार्थ)ची कथित बेकायदेशीर लागवड केल्याचा प्रकार शिरपूर तालुका पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दिनांक 30 ऑगस्ट 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चिलारे परिसर, पोस्ट सुळे, ता. शिरपूर येथे धडक कारवाई करून तब्बल 330 किलो कॅनाबीस सदृश्य अंमली पदार्थ जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत 82 लाख 50 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, प्रभारी अधिकारी, शिरपूर शहर पोलीस ठाणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी माहितीची खातरजमा करून अतिदुर्गम चिलारे परिसरातील वनविभागाच्या जमिनीवर छापा टाकला. यावेळी शिलदार कालुसिंग पावरा आणि दिपक अभिमान पावरा (वय 42 वर्षे), दोघे रा. चितारे, पोस्ट सुळे, ता. शिरपूर, जि. धुळे हे वनजमिनीवर कपाशी व तुरीच्या पिकामध्ये कॅनाबीस वनस्पतीची लागवड करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.कारवाईदरम्यान दोन शासकीय पंच, वजनकाटाधारक, फोटोग्राफर तसेच राजपत्रित अधिकारी यांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घटनास्थळावरून 330 किलो कॅनाबीस सदृश्य अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी जप्त पदार्थाची किंमत प्रति किलो 25 हजार रुपये या प्रमाणे एकूण 82,50,000 रुपये असल्याचे नमूद केले आहे.छाप्याची चाहूल लागताच शिलदार कालुसिंग पावरा हा शेतातून पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले, तर दिपक अभिमान पावरा यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पसार झालेल्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 242/2026 नुसार गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) अंतर्गत कलम 8(क), 20(अ)(i) आणि 28 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त पदार्थाबाबत वैधानिक नमुना प्रक्रिया व पुढील तपासानंतर प्रकरणातील तथ्य निश्चित होणार आहेत.अतिदुर्गम आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन अंमली पदार्थांची कथित लागवड करण्यात आली असल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कथित लागवडीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, जप्त पदार्थाचा पुढील पुरवठा कुठे केला जाणार होता, तसेच या प्रकरणाचे अन्य काही धागेदोरे आहेत का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक धुळे श्री. विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली.कारवाईमध्ये शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक मिलींद पवार, पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे तसेच पोलीस अंमलदार सागर ठाकुर, संतोष पाटील, संदिप ठाकरे, संजय चव्हाण, जगन्नाथ कोळी, मोहन पाटील, योगेश मोरे, विजय ढिवरे, संजय भोई, सुनिल पवार, ग्यानसिंग पावरा, मुकेश पावरा, वाला पुरोहित, मनोज नेरकर, गिरधर पाटील, मनोज पाटील आणि इसरार फारुकी यांनी सहभाग घेतला.अंमली पदार्थांच्या कथित बेकायदेशीर लागवडीविरोधात शिरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणावर कॅनाबीस सदृश्य पदार्थ जप्त झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पसार झालेल्या संशयिताचा शोध आणि या प्रकरणामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी तपास यंत्रणा पुढील कार्यवाही करीत आहे.
![]()
