सत्यध्येय एकविचार शिंदखेडा (प्रतिनिधी – यादवराव सावंत):
सणासुदीच्या काळात केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित न राहता सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्यासाठी शिंदखेडा तालुका मराठी पत्रकार संघ व मित्रपरिवाराने पुढाकार घेतला आहे. बस स्टँड समोरील पत्रकार संघ संपर्क कार्यालयात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली असून, या निमित्ताने दररोज विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी ‘सणासुदीच्या काळातील पोलीस प्रशासन आणि सायबर क्राईम’ या अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या विषयावर विशेष चर्चासत्र पार पडले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिंदखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) मयूर भामरे उपस्थित होते.सायबर फसवणूक झाल्यास १९३० वर त्वरित संपर्क साधावा असे उपस्थितांशी संवाद साधताना एपीआय मयूर भामरे यांनी सध्या वाढत्या सायबर गुन्ह्यांवर आणि त्यापासून बचावाच्या उपायांवर सखोल मार्गदर्शन केले.अनधिकृत किंवा संशयास्पद एपीके (APK) फाईल्स मोबाईलमध्ये डाऊनलोड करू नयेत.सायबर फसवणूक अथवा आर्थिक गुन्हे घडल्यास नागरिकांनी घाबरून न जाता १९३० या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.मार्गदर्शनानंतर भामरे यांनी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचा उत्तरार्ध श्री गणेशाच्या भावपूर्ण महाआरतीने झाला. गणेशोत्सवाच्या काळात धार्मिक उत्सवाला सामाजिक व विचारांची जोड देणारा असा प्रबोधनात्मक उपक्रम राबवणारा शिंदखेडा तालुका मराठी पत्रकार संघ हा परिसरातील पहिलाच संघ ठरला आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे शिंदखेडा शहरासह संपूर्ण तालुक्यातून विशेष कौतुक होत आहे.या कार्यक्रमास शिंदखेडा तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दीपक माळी, प्रा. अजय बोरदे, जितेंद्र मेखे, परेश शहा, यादवराव सावंत, मित्रपरिवारातील सुनील चौधरी आणि प्रा. जितेंद्र पाटील उपस्थित होते. तसेच पोलीस स्टेशनच्या गोपनीय विभागाचे अनंत पवार, दिनेश गोसावी यांच्यासह पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
