सत्यध्येय एकविचार शिंदखेडा (यादवराव सावंत प्रतिनिधी) :
शिंदखेडा तालुक्यात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे खरीप पिकांची अत्यंत गंभीर अवस्था झाली आहे. कापूस, सोयाबीन, मका, बाजरी यांसह विविध पिके धोक्यात आली असताना, प्रशासनाकडून कागदोपत्री ५१ टक्के नजर आणेवारी दाखवली जात आहे. प्रत्यक्ष शेतातील भयानक वास्तव आणि प्रशासनाची ही आकडेवारी यात मोठी तफावत असल्याचा आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख शानाभाऊ रामभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली २४ सप्टेंबर २०२६ रोजी सहाय्यक महसूल अधिकारी राणे यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. “दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना प्रत्यक्ष पाहणी न करता नजर आणेवारी लावण्याची घाई का? शेतकऱ्याच्या शेतातील नुकसान कागदावरही दिसले पाहिजे,” असा संतप्त सवाल त्यांनी केला. तालुक्यातील नजर आणेवारीची प्रत्यक्ष पीक परिस्थितीशी तुलना करून फेरतपासणी करावी, नुकसानग्रस्त सर्व गावांमध्ये तातडीने पंचनामे करावेत आणि प्रत्यक्ष नुकसान अधिक आढळल्यास सुधारित अहवाल शासनाकडे पाठवावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
या आंदोलनादरम्यान माळीच गावातील महिला शेतकरी छायाबाई यशवंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. “शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, शासनाने शेतकऱ्यांबाबत सहानुभूती व संवेदनशीलता दाखवावी,” अशी आर्त हाक त्यांनी यावेळी दिली.
शेतकरी नियमितपणे पीक विमा भरतात, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतरही भरपाई मिळण्यासाठी विविध किचकट प्रक्रियेचा सामना करावा लागतो. यावर भाष्य करताना शानाभाऊ सोनवणे यांनी, “पीक विमा नेमका शेतकऱ्याच्या संरक्षणासाठी आहे की केवळ कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी?” असा सवाल उपस्थित केला. पावसाचा खंड आणि अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांना प्रभावी विमा संरक्षण मिळण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, विमा दावा नाकारल्यास त्याचे कारण लेखी स्वरूपात देण्यात यावे, विमा योजनेचे नियम सोप्या मराठी भाषेत गावपातळीवर जाहीर करावेत आणि पारदर्शकता ठेवावी, अशी मागणीही करण्यात आली.
दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत घोषित करावी, पात्र शेतकऱ्यांवरील बँक व सोसायट्यांचा कर्जवसुलीचा तगादा तात्काळ थांबवावा आणि आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
“आकडेवारी चुकीची असेल आणि पीक विमा धोरणातूनही शेतकऱ्याला अपेक्षित संरक्षण मिळत नसेल, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्याने न्याय मागायचा कुठे?” असा सवाल करत प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी व शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. निवेदनावर जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्यासह सर्जेराव पाटील, नंदकिशोर पाटील, मनोज पवार, मनोहर राजपूत, संजय देसले, छायाबाई पाटील, आर. आर. पाटील, आधार बोरसे, प्रवीण बोरसे, संजय धनगर, कुणाल बोरसे, गणेश सोनार, ईश्वर देसले, रघुनाथ पाटील आदींसह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
