शिंदखेडा | प्रतिनिधी
तालुक्यातील वरसुस येथे वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांच्या ४८६ व्या जयंतीनिमित्त क्षत्रिय महाराणा प्रताप मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आणि महाराणा प्रतापांच्या राष्ट्रसेवा व लोककल्याणाच्या विचारांना अभिवादन करत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला ग्रामस्थ व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपसरपंच भरतसिंग राजपूत यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिरास सुरुवात झाली. गावातील युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांनीही मोठ्या उत्साहाने रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडविले.विशेष म्हणजे, रक्तदानासाठी महिलांनीही पुढाकार घेतला. उषाबाई पदमसिंह गिरासे यांनी प्रथम रक्तदान करून महिलांसमोर आदर्श निर्माण केला. तसेच शिंदखेडा येथील ज्येष्ठ पत्रकार यादवराव सावंत, उपसरपंच भरतसिंग राजपूत यांच्यासह एकूण ५४ रक्तदात्यांनी रक्तदान करून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प पूर्ण केला.या रक्तदान शिबिरासाठी स्वर्गीय मुकेशभाई पटेल ब्लड सेंटर, शिरपूर यांनी रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली. यावेळी डॉ. मनोजसिंग परदेशी, भाग्यश्री राजपूत, योगेश चौधरी, शेखर पाटील, कल्पना पाटील व दिनेश पावरा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जितेंद्र गिरासे, महेश कोळी, गणेश गिरासे, रत्नदीप गिरासे, दीपक सोनार यांच्यासह क्षत्रिय महाराणा प्रताप मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.यावेळी बोलताना उपसरपंच भरतसिंग राजपूत म्हणाले की, “महाराणा प्रताप जयंती म्हणजे केवळ उत्सव नाही तर त्यांच्या त्याग, शौर्य आणि समाजसेवेच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. ढोल-डीजेवर खर्च करण्याऐवजी रक्तदानासारख्या विधायक उपक्रमातून समाजाला उपयोगी पडणे हीच खरी महाराणा प्रतापांना मानवंदना आहे.”वरसुस येथील या उपक्रमाने “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश समाजात पोहोचवित महाराणा प्रताप जयंतीला सामाजिक सेवेची अर्थपूर्ण जोड दिली. गावातील युवक व महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला असून सर्व स्तरांतून मंडळाचे कौतुक होत आहे.
![]()
