अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर तालुक्यातील कवडे मळा परिसरात घडलेल्या लक्ष्मण मार्तंड काळे यांच्या निर्घृण खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांच्या आत छडा लावत चार आरोपींना जेरबंद केले आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २०२६ रोजी रात्री ११ ते १६ जून रोजी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान जाधव मळा, कवडे मळा रोड परिसरात अज्ञात आरोपींनी लक्ष्मण काळे यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. याचवेळी फिर्यादी महिला झोपेत असताना तिच्यावरही प्राणघातक हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) व १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना तातडीने आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्याचे आदेश दिले.त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये, पोलीस अंमलदार शाहिद शेख, सुनिल पवार, अरविंद भिंगारदिवे, गणेश धात्रक, योगेश भिंगारदिवे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, भाऊसाहेब काळे, महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे, सोनल भागवत, चिमा काळे तसेच चालक भगवान धुळे आणि अरुण मोरे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.सदर पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन तपासणी आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान लक्की उर्फ बाबा राहुल वैराळ, करण विशाल शिंदे, गणेश उर्फ गणीबाबा मनोज चावरे, विशाल उर्फ रानटी रामचंद्र उमाप यांच्यासह इतर साथीदारांचा सहभाग समोर आला.आरोपी देहेरे गावातील खंडोबाच्या मळ्यात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पथकाने तात्काळ सापळा रचला आणि चार संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान मुख्य आरोपी लक्की उर्फ बाबा राहुल वैराळ याने आपल्या साथीदारांसह जमिनीच्या वादातून हा खून केल्याची कबुली दिली.पोलिसांनी आरोपींकडून एक मोबाईल, जिओ कंपनीचे सिमकार्ड असा एकूण २० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी कोतवाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे.अवघ्या २४ तासांत खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा करत आरोपींना जेरबंद करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये, पोलीस अंमलदार शाहिद शेख, सुनिल पवार, अरविंद भिंगारदिवे, गणेश धात्रक, योगेश भिंगारदिवे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, भाऊसाहेब काळे, महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे, सोनल भागवत, चिमा काळे तसेच चालक भगवान धुळे आणि अरुण मोरे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
![]()
