सत्यध्येय एकविचार चोपडा | प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील वडती गावात रविवारी सकाळी घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. जन्मदात्या वडिलांनी स्वतःच्या दोन निष्पाप मुलांवर झोपेत असताना धारदार कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात मीरा सुभाष भिलाला (वय १३) हिचा जागीच मृत्यू झाला, तर रामू सुभाष भिलाला (वय ११) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.प्राथमिक माहितीनुसार, सुभाष गोपाळ भिलाला (वय ५०, रा. वडती, ता. चोपडा) याने रविवारी पहाटे घरात गाढ झोपलेल्या आपल्या मुलांवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घरात एकच आक्रोश उसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोन्ही मुलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या मीराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार होऊन जवळील जंगलात लपून बसल्याची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवत काही वेळातच आरोपीला जंगलातून ताब्यात घेतले. सध्या त्याची सखोल चौकशी सुरू असून गुन्ह्याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.प्राथमिक तपासात ही घटना पूर्वनियोजित होती की अचानक संतापातून घडली, याचा तपास सुरू आहे. कौटुंबिक वाद, मानसिक अस्थिरता किंवा इतर कोणते कारण या घटनेमागे आहे का, याची सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी हल्ल्यात वापरण्यात आलेली कुऱ्हाड व अन्य महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत.या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खुनाचा तसेच खुनाच्या प्रयत्नासह इतर संबंधित गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास अडावद पोलीस करीत आहेत.या दुर्दैवी घटनेमुळे वडती गावासह संपूर्ण चोपडा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. जन्मदात्या बापाने स्वतःच्या लेकरांवर एवढे क्रूर पाऊल का उचलले, हा प्रश्न सर्वांनाच अस्वस्थ करणारा ठरत असून नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
![]()
