चोपडा व अमळनेर तालुक्यातील तापी नदीपात्र परिसरात अवैध वाळू उत्खननाने अक्षरशः उच्छाद मांडला असून, निमगव्हाण, वायकी, सावखेडा, दापोली, नालखेडा आणि मुंगसे येथील बाळू उपसा केंद्रांवर नियमांना सर्रास केराची टोपली दाखवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या आडोशात सुरू असलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
⚠️ नियम धाब्यावर – अवजड यंत्रसामग्रीचा खुलेआम वापर
नियमांनुसार नदीपात्रातून केवळ हाताने मर्यादित प्रमाणात वाळू उपसा करण्यास परवानगी असताना, प्रत्यक्षात मात्र जेसीबी व पोक्लेनसारख्या अवजड यंत्रसामग्रीचा बिनधास्त वापर होत असल्याचे चित्र आहे. यामुळे खनिज विकास व विनियमन कायद्याचे उघड उल्लंघन होत असून, संबंधित यंत्रणांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.या भागातून रात्री उशिरापर्यंत ओव्हरलोड वाळू वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत आहे. मोठमोठे डंपर क्षमतेपेक्षा अधिक वाळू घेऊन वाहतूक करत असल्याने शासनाला कोट्यवधींचा महसूल तोटा सहन करावा लागत आहे. रस्त्यांची हानी, अपघातांचा धोका आणि नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अवैध उत्खननामुळे नदीपात्राची झपाट्याने हानी होत असून भूगर्भजल पातळी खालावत आहे. पूरस्थितीचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दीर्घकालीन दुष्परिणामांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे.निमगव्हाण, वायकी,सावखेडा, दापोली, नालखेडा, आणी मुंगसे परिसरातील हालचालींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. जिल्हा प्रशासन, खनिकर्म विभाग आणि महसूल यंत्रणेने तातडीने हस्तक्षेप करून अवैध उत्खनन व ओव्हरलोड वाहतुकीवर लगाम घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.तापी नदीपात्रातील हा प्रकार केवळ महसूल चोरीपुरता मर्यादित नसून पर्यावरणीय समतोल आणि प्रशासनाच्या विश्वासार्हतेलाही तडा देणारा ठरत आहे. आता तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी आणि दोषींवर कायद्याचा बडगा उगारावा, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे.
![]()
