धुळे/प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील लळिंग घाट परिसरात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण उत्तर महाराष्ट्र हादरला असून या दुर्घटनेत सहा निष्पाप नागरिकांचा जागीच मृत्यू तर 20 ते 25 जण गंभीर जखमी झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने धावणाऱ्या कथित ओव्हरलोड वाळू डंपरने दिलेल्या भीषण धडकेमुळे हा रक्तरंजित अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या घटनेनंतर अवैध वाळू वाहतूक, ओव्हरलोड डंपर आणि प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेवर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महामार्गावर दिवस-रात्र क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून डंपर वाहतूक सुरू असते. अनेक डंपर वेगमर्यादेचे उल्लंघन करून जीव धोक्यात घालणाऱ्या पद्धतीने धावत असल्याचा आरोप होत आहे.
नागरिकांनी उपस्थित केलेले प्रमुख प्रश्न असे —
ओव्हरलोड डंपर महामार्गावरून खुलेआम कसे धावतात?
आरटीओ व संबंधित तपासणी यंत्रणांच्या नजरेसमोर नियमबाह्य वाहतूक होत असताना कठोर कारवाई का होत नाही?
पोलिस चौक्या आणि हायवे ट्रॅप यंत्रणा असतानाही जीवघेणी वाहतूक रोखण्यात अपयश का येत आहे?
निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?
स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की, अनेक वेळा तक्रारी करूनही प्रत्यक्ष कारवाई होत नाही. केवळ कागदोपत्री मोहीम राबवून प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. “क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरलेले डंपर तपासणी यंत्रणांसमोरून जातात, मात्र त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नाही,” असा आरोपही नागरिकांनी केला आहे.दरम्यान, कायदेतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ओव्हरलोड वाहतूक, वेगमर्यादेचे उल्लंघन, अवैध वाळू उत्खनन व वाहतूक साखळी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या कथित दुर्लक्षाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे येत आहे. दोषी आढळणाऱ्या वाहन चालक, मालक किंवा संबंधित जबाबदार व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेनुसार कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे.
महसूल विभागाच्या अटींचे पालन आवश्यक
महसूल विभागामार्फत वाळू लिलाव धारकांना शासनाच्या अटी व शर्तींनुसार परवानगी दिली जाते. मात्र काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप होत असून, शासनाची दिशाभूल करून ओव्हरलोड वाहतूक केली जात असल्याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांनी उपाययोजनांची मागणी केली आहे —
वाळू लोडिंग ठिकाणीच वाहनांचे अधिकृत वजन काट्यावर मोजमाप करण्यात यावे.
क्षमतेपेक्षा जास्त वाळू आढळल्यास संबंधित वाहन तात्काळ रद्द करण्यात यावे.
संबंधित वाहनाची रॉयल्टी तत्काळ रद्द करण्यात यावी.
अवैध व ओव्हरलोड वाहतुकीवर विशेष संयुक्त मोहीम राबवावी.
महामार्गांवर सीसीटीव्ही व डिजिटल वजन तपासणी प्रणाली बसवावी.
मृतांच्या कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत व जखमींना मोफत उपचार द्यावेत.
नियमभंगास संरक्षण देणाऱ्या दोषी घटकांवर गुन्हे दाखल करावेत.
या भीषण घटनेमुळे सहा कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. सर्व स्तरांतून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
“रस्त्यावर धावणारे ओव्हरलोड डंपर केवळ वाळू वाहत नाहीत, तर नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहेत,” अशी तीव्र प्रतिक्रिया संतप्त नागरिकांतून व्यक्त होत आहे.
![]()
