शहादा | प्रतिनिधी
शहादा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा शहराच्या विकासासाठी सातत्याने सक्रिय असलेले श्री. अभिजित विमलबेन मोतीलाल पाटील यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या सचिवपदी निवड झाल्याने नंदुरबार जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील तब्बल ३९५ नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या महासंघातील महत्त्वाच्या पदावर निवड होणे ही शहादा शहरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
दि. ९ जून २०२६ रोजी मुंबई येथील अंधेरी परिसरातील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुख्यालयात नगरपरिषद महासंघाच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये सचिवपदाची धुरा शहाद्याचे नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली.महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघ हा राज्यातील नगरपरिषदांच्या विविध समस्या, विकासकामे, निधी वाटप, प्रलंबित प्रशासकीय प्रश्न, शहरी पायाभूत सुविधा, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयांबाबत प्रभावी भूमिका मांडणारा महत्त्वाचा संघटनात्मक मंच आहे. अशा संघटनेच्या सचिवपदी निवड झाल्यामुळे अभिजित पाटील यांच्यावर राज्यभरातील नगरपरिषदांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.महासंघाच्या अध्यक्षा मा. सौ. रुचिता घोरपडे, कार्याध्यक्ष श्री. रंजीत चव्हाण, संयोजक श्री. लक्ष्मणराव लटके तसेच उपाध्यक्ष व महाबळेश्वरचे नगराध्यक्ष श्री. सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी राज्यातील सहाही महसूल विभागांतील नगराध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.अभिजित पाटील यांच्या निवडीमुळे शहादा शहरासह नंदुरबार जिल्ह्याचा राज्यस्तरावरील प्रभाव वाढणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी, नगरपरिषदांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तसेच राज्यातील शहरी विकासाच्या धोरणांमध्ये प्रभावी योगदान देण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा लाभ महासंघाला होणार असल्याचा विश्वास उपस्थित नगराध्यक्षांनी व्यक्त केला.दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून, शहादा शहराच्या विकासाला नवसंजीवनी मिळेल, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
![]()
