सत्यध्येय एकविचार दोंडाईचा | प्रतिनिधी
दोंडाईचा शहरातील विविध मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे व परिसरात अनेक दिवसांपासून दुर्लक्षित अवस्थेत पडलेल्या तसेच खंडित झालेल्या हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींचा सन्मान राखण्यासाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत शास्त्रोक्त पद्धतीने त्यांचे पूजन करून सारंगखेडा येथील तापी नदीच्या पात्रात विधीवत व सन्मानपूर्वक विसर्जन करण्यात आले. हा धार्मिक उपक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडला.धर्मशास्त्रानुसार खंडित झालेल्या किंवा पूजेस अयोग्य ठरलेल्या देवी-देवतांच्या मूर्तींचा अनादर न करता त्यांचे विधीवत विसर्जन करणे आवश्यक मानले जाते. हीच धार्मिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने शहरातील विविध भाग, मंदिर परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी पडून असलेल्या खंडित व दुर्लक्षित मूर्ती अत्यंत आदराने संकलित करण्यात आल्या.त्यानंतर सर्व मूर्ती सारंगखेडा येथील पवित्र तापी नदीच्या पात्रात नेण्यात आल्या. तेथे वैदिक मंत्रोच्चार, शास्त्रोक्त पूजन, आरती व धार्मिक विधी पूर्ण करून प्रत्येक मूर्तीचे सन्मानपूर्वक विसर्जन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित धर्मप्रेमींनी “जय श्रीराम”, “हर हर महादेव” आणि “भारत माता की जय”च्या घोषणांनी परिसर भक्तिमय केला.यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हिंदू धर्मातील श्रद्धास्थानांचा अनादर होऊ नये, तसेच खंडित मूर्ती रस्त्यावर, कचराकुंडीत किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकण्याऐवजी धर्मशास्त्रानुसार त्यांचे विसर्जन व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अशा प्रकारच्या धार्मिक जनजागृतीमुळे समाजात श्रद्धा, संस्कृती आणि धार्मिक मूल्यांचे जतन होण्यास निश्चितच मदत होईल.या पवित्र उपक्रमासाठी शहरातील धर्मप्रेमी नागरिक, बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ बांधव आणि स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मोलाचे सहकार्य केले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा धार्मिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल आयोजकांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.धर्मसंरक्षण, धार्मिक परंपरांचे जतन आणि हिंदू समाजामध्ये श्रद्धा व संस्कार वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
![]()
