चोपडा तालुक्यातील तापी नदीपात्र परिसरात अवैध वाळू उत्खननाचा प्रकार दिवसेंदिवस उघडकीस येत असून, निमगव्हाण व वायकी येथील बाळू उपसा केंद्रांवर नियमांना केराची टोपली दाखवत सर्रास उत्खनन सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप वाढू लागला आहे.
नियमांनुसार नदीपात्रातून हाताने मर्यादित प्रमाणात वाळू उपसा करण्यास परवानगी असताना, येथे मात्र जेसीबी व पोक्लेनसारख्या अवजड यंत्रसामग्रीचा खुलेआम वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे खनिज विकास व विनियमन कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे, या भागातून रात्री उशिरापर्यंत मोठ्या डंपरद्वारे ओव्हरलोड वाळू वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. परिणामी शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल तोटा सहन करावा लागत असून, पर्यावरणीय समतोलही धोक्यात येत आहे. नदीपात्राची हानी, भूगर्भजल पातळीतील बदल आणि पूरस्थितीचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
“प्रशासन गप्प का?” – नागरिकांचा थेट सवाल
या गंभीर प्रकाराबाबत स्थानिकांनी अनेकदा महसूल विभाग व संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसीलदार व तलाठी ‘नॉट रिचेबल’ असल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. कारवाई अपेक्षित असताना अधिकारी संपर्काबाहेर का, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.निमगव्हाण व वायकी परिसरात सुरू असलेल्या हालचालींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. जिल्हा प्रशासन, खनिकर्म विभाग व महसूल यंत्रणेने तातडीने हस्तक्षेप करून अवैध उत्खनन आणि ओव्हरलोड वाहतुकीवर लगाम घालावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तापी नदीपात्रातील हा प्रकार केवळ महसूल चोरीपुरता मर्यादित नसून पर्यावरण आणि प्रशासनाच्या विश्वासार्हतेलाही मोठा धक्का देणारा आहे. आता तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन सत्य परिस्थिती स्पष्ट करावी आणि दोषींवर कायद्याचा बडगा उगारावा, अशीच जनतेची ठाम भूमिका आहे.
![]()
